Loksabha Election 2024: जागावाटप, आढावा बैठकी, चर्चांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या हलचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने तर थेट 400 पारची घोषणा दिली आहे. पण भाजपा 400 पार जाणार की नाही हे जनताच ठरवणार आहे. मतदार जे ठरवतील तेच होणार असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये आंबेडकर यांनी हे विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवरुनही त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं.


हे सरकार फसवणुकीची हमी देतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असून आता असेच सरकार येणार असल्याचं मतदारांनी ठरवल्याचं ते म्हणाले. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. विद्यमान सरकारवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकरांनी, सध्या चांगल्या प्रशासनाची हमी देणाऱ्या या सरकारकडून मागील 10 वर्षांपासून रोजगारीची हमी दिली जात असली तरी बेरोजगारी वाढली आहे, असं म्हटलं. मनोज जरांगे पाटलांना आरक्षण देतो असं सांगून त्यांना निराश होऊनच परत जावं लागलं. हे सरकार फसवणुकीची हमी देतं, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला.


मोदींना मत म्हणजे हा परवानाच


प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी हे गुजरात धार्जीण आहेत असं म्हणत टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगांचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करताना मोदींचा एकेरी उल्लेख करत टीका केली. "मोदींकडून गुजरातच्या माणसांना एक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणल्यास पुढील 5 वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेलेच म्हणून समजा," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. "तुम्हाला ही गोष्ट पचवणे कठीण आहे, याची मला कल्पना आहे. मात्र इथले कारखाने पळवले की नाही? तसेच उद्या ते पुन्हा पळवले जातील. मताच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचा परवानाच द्याल. म्हणूनच भाजपाला मतदान करु नका," असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी समर्थकांना केलं.


2026 मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल


आर्थिक धोरणांवरुनही प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. "मागील 10 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या कारभारामुळे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे. एखाद्या व्यक्तीला 10 हजार पगार असेल आणि १० हजार रुपये बँकेला हप्ता द्यावा लागत असेल तर शिल्लक राहतं का काही? मग अशावेळी माणूस घर-दार विकायला काढतो. मोदी आणि आरएसएसला परत निवडून दिल्यास 2026 मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल. जगण्यासाठी दारुडा जसा भांडी, फर्निचर विकतो आणि मग शेवटी घर विकून रस्त्यावर येतो. भाजपाकडे सत्ता गेल्यास अशीच वेळ येऊ शकते," असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपावर निशाणा साधला.


दरडोई कर्जाचा आकडा वाढला


"मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. "तुम्हाला कर्जात डुबायचं नसेल तर तुम्ही भाजपाविरोधात मत दिलं पाहिजे. मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येकाच्या डोक्यावर 24 रुपयांचे कर्ज होते. मागील 10 वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा 84 रुपयांवर पोहोचला आहे," असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात केला.