Loksabha Election 2024 : महाविकासआघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटासह मित्र पक्षातील मोठ्या नेत्यांनीही विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊतही यास अपवाद नाहीत. प्रचाराच्या रमधुमाळीदरम्यान राऊतांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेदरम्यान विरोधकांवर चौफेर टीकेची झोड उठवत सांगलीतील मतदारांविषयी आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविषयी विश्वासार्ह वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीत तिरंगी लढत करण्यात कोणाचे डाव पेच आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या क्षणी सांगलीत भाजपचे उमेदवार असून, पक्ष त्या दोन्ही उमेदवारांना रसद पुरवत असल्याचं म्हटलं. सध्याच्या घडीला सांगलील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सर्व बाबतीत आघाडी घेतली असून, महाराष्ट्रातील इतर जागांविषयी आम्हाला विश्वास असून सांगलीतील जागेबाबतही असा विश्वास असल्याचं म्हणत त्यांनी नकळत चंद्रहार पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली. 


सांगलीतील जागेवर मविआचं पारडं जड नसतं, तर भाजपला पंतप्रधान मोदी, अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असा इतका सारा फौजफाटा आणून इथं मैदानात उतरवण्याची गरज नव्हती, इथं काही लोक काकांसाठी येतायत तर, काही लोकं दादांसाठी येतात. पण, आमचा पैलवान ही राजकीय कुस्ती मारणार अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. 


विश्वजीत कदम यांच्या 'मी सांगलीचा वाघ', या विधानावर प्रतिक्रिया देत असताना सांगलीमध्ये आम्ही वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ पाहिला आणि आता विश्वजीत कदम वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल. तूर्तास, शिवसेना हीच सर्टिफाईड वाघ अशी डरकाळी त्यांनी यावेळी फोडली. यावेळी सांगलीच्या जनतेला वाघाची उपमा देत ही जनता/ मतदार कोणतेही डावपेच सहन न करता चंद्रहार पाटील यांना विजयी करेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. 


हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; महाडमधील दुर्घटना


 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधा नाराजीचा तीव्र सूर आळवताना ते स्वत: अडचणीत असून खोटं बोलत असल्याची टीका राऊतांनी केली. यावेळी चाणक्यनितीतील अडचणीतला व्यापारी आणि त्याची खोटं बोलण्याची सवय याचा संदर्ब त्यांनी दिला. सध्याच्या घडीला शिंदे गटाच्या शिवसेनेवर असणारं पंतप्रधानांचं प्रेम खोटं असल्याचं म्हणत त्यांनी यावेळी पवार कुटुंबात पक्षातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून फूट पडल्याच्या सर्व चर्चा त्यांनी धुडकावल्या. 


भाजपला उद्देशून उद्या तुमची सत्ता गेली तर तुमच्या पक्षात वाईट कलह निर्माण होईल हे लिहून ठेवा असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ब्रह्मदेव नाहीत, इथं राम आणि कृष्णही आले गेले इथे मोदी आणि शाह कोण? असा बोचरा सवाल त्यांनी निवडणुकीदरम्यान सुरु असणाऱ्या या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रादरम्यान विचारला.