22 पैकी 17 जागांवरच ठाकरेंचे उमेदवार! `या` 5 जागांवर `मशाल` कोणाच्या हाती? संभ्रम कायम
Uddhav Balasaheb Thackeray Group 5 Seats Which Are Not Announced: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकूण 17 जागांची घोषणा केली आहे. मात्र ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार असून अद्याप 5 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या जागा कोणत्या आहेत आणि येथील राजकीय गणित काय आहे पाहूयात...
Uddhav Balasaheb Thackeray Group 5 Seats Which Are Not Announced: उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून एकूण 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र ठाकरे गट एकूण 22 जागा लढणार असल्याने अद्याप 5 जागांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही. दरम्यान पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. उर्वरित जागांबद्दल चर्चेनंतर निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहेत. कोणत्या 5 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही हे पाहूयात...
उत्तर मुंबई
उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. फेब्रवारी महिन्यामध्ये विनोद घोसाळकरांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळेच घोसाळकर कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून याचा विचार करता अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही उमेदवारी जाहीर होऊ शकते.
जळगाव
जळगाव मतदारसंघामधून ललिता पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप यावर एकमत झालेलं नसल्याने उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
कल्याण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघामध्ये त्यांच्या खासदारपुत्राविरुद्ध कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याबद्दल महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही. श्रीकांत शिंदेंसारख्या प्रबळ उमेदवाराविरुद्ध नेमकं कोणाला निवडणुकीत उतरवावं यासंदर्भातील चाचपणी सुरु आहे. सध्या तरी स्थानिक पातळीवर ठाकरे गटाबरोबरच महाविकास आघाडीकडे कोणताही आश्वासक चेहरा नसल्याने आयात उमेदवार या मतदारसंघात द्यावा लागणार असं निश्चित मानलं जात आहे. सध्या ठाकरे गटाकडून ज्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची चर्चा आहे त्या उमेदवाराचं नाव आहे केदार दिघे! एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे असलेले केदार दिघे हे शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाण्यामध्ये ठाकरे गटाची बाजू सातत्याने लावून धरत आहेत. एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य म्हणून ओळखले जातात. अगदी चित्रपटापासून ते दर कार्यक्रमामध्ये शिंदे आवर्जून आनंद दिघेंचा उल्लेख करतात. त्यामुळेच शिंदेच्या पुत्राची लढत त्यांच्या गुरुंच्या घरातील व्यक्तीबरोबर व्हावी असं उद्धव ठाकरे गटाचं नियोजन असल्याचं समजतं. मात्र असं असलं तरी स्थानिक पातळीवर केदार दिघे हे किती प्रभावी ठरतील याबद्दल उद्धव ठाकरे गटामध्येच मतमतांतरे आहेत.
उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेंच्या बंडानंतर त्यांच्याकडे जो पदभार होता तो म्हणजेच ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा पदाभर केदार दिघेंकडे सोपवण्यात आला. मात्र या पदावर काम करताना केदार दिघेंना फारशी छाप पाडता आलेली नाही. त्यामुळेच केदार दिघेंना उमेदवारी देण्याबद्दल उद्धव ठाकरे गट उत्सुक असला तरी महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांची त्याला सहमती मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे.
नक्की वाचा >> 'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'
पालघर
पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते. ठाणे जिल्ह्याप्रमाणेच हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा असलेला मतदारसंघ असल्याने येथील उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडणूक आव्हानात्मक ठरेल हे निश्चित.
हातकंणगले
हातकंणगले मतदारसंघामधील उमेदवार ठाकरे गटाने जाहीर केलेला नाही. हा मतदारसंघ शिवसेना शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाणार आहे. मात्र शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत येण्यासाठी अट ठेवण्यात आल्याची माहिती, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.