Loksabha Election: लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या राज्यात वाहत आहेत. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सोलापुर, माढा हे मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सालापुरातून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. तर, भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापुरमध्ये मतदान पार पडणार आहे. 19 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्या पार्श्वभूमीवर आज प्रणिती शिंदे या अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचे वर्चस्व होते. मात्र, 2019च्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. तर प्रणिती शिंदे या गेल्या तीन टर्म सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळं काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. प्रणिती शिंदे यांच्या विजयसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. प्रणिती शिंदे यांना आता भगीरथ भालके यांनीही पाठिंबा दिला आहे. 


भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिल्याने प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार आहे. भालके गटाचे समर्थकांचाही पाठिंबा प्रणिती शिंदेंना मिळणार आहे. भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार भरत भालके यांचे पुत्र आहे. भरत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीचे तिकिट दिले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. 


पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीत 1 लाख 5 हजार मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी भगीरथ भालके पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना पाठिंबा देणार आहेत. पोट निवडणुकीत भालके यांनी 1 लाख मते घेतली होती. त्यामुळं महाविकास आघाडीला आणखी ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे.


प्रणिती शिंदेंची भव्य रॅली


प्रणिती शिंदे आज महाविकास आघाडीच्यावतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महापुरुषांना अभिवादन करून प्रणिती शिंदे रॅलीत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे काँग्रेस भवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळेत रॅलीला सुरुवात होणार आहे. 


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधी महापुरुषांच्या  पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस भवन येथे रॅली सहभागी होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज महाविकास आघाडीचे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.