अजित दादांनीच आम्हाला भाजपमध्ये पुढे पाठवलं- भाजप आमदार पुत्राची धक्कादायक कबुली
Malhar Patil On Bjp Entry: धाराशिवमध्ये भाजप आमदार पुत्राच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.
Malhar Patil On Bjp Entry: लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसतसे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेते मंडळी राजकीय मंचावरुन नवनवी आश्वासन देतायत, एकमेकांची उणीधुणी काढतायत. जुन्या कढीला ऊत आणला जातोय, असे अनेक प्रकार घडतायत. धाराशिवमध्ये भाजप आमदार पुत्राच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया.
भाजपा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी धाराशिव लोकसभेचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच 2019 ला राष्ट्रवादी सोडल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली. या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अजित पवार यांनीच पाटील कुटुंबीयांना भाजपामध्ये पुढे पाठवले. त्यानंतर ते स्वतः भाजपासोबत सहभागी झाले असं वक्तव्य मल्हार पाटील यांनी केले आहे. सध्या धाराशिव लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना एका प्रचार सभेत बोलताना मल्हार पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन किर्तीकर?
माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव राणा जगजित सिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. पाटील कुटुंबियांचे हे बंड शरद पवारांच्या चांगलेच जिव्हारी लागलं होतं. मल्हार पाटील यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा एकदा डॉक्टर पाटील कुटुंबीयांच्या बंडाची चर्चा सुरू झाली आहे.