First phase of the campaign Of Loksabha : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहेत. महाराष्ट्रात ज्या पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे, त्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याठिकाणचा प्रचार बुधवारी संपला. महाराष्ट्रातल्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या. आता विदर्भातील मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी त्यांची लढत आहे. वंचितनं काँग्रेसचे विकास ठाकरेंना पाठिंबा दिलाय. तर बसपाचा हत्ती कशी चाल खेळतो यावर वरच गणित अवलंबून आहे.


चंद्रपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तगडं आव्हान निर्माण केलं आहे. वंचितचे राजेश बेले आणि बसपाचे राजेंद्र रामटेके हे ही रिंगणात आहेत. चंद्रपूरची ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.


रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना शिवसेनेचे राजु पारवे यांनी आव्हान दिलंय. काँग्रसचे बंडखोर किशोर गजभिये देखील रिंगणात आहेत.  त्यांना वंचितनं पाठिंबा दिलाय. अपक्ष गजभिये काँग्रेसचा आणि शिवसेनेला धक्का देणार की दोघांच्या लढाईत स्वतःच बाजी मारणार ते पहावं लागेल.


भंडारा गोंदियामध्ये भाजप खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. हे दोघेही कुणबी आहेत. भाजपातून बसपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेले संजय कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत. संजय केवट हे धिवर समाजाचे आहेत. अपक्ष सेवक वाघाये हेही कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे कुणबी, तेली, पोवार आणि एसी समाजाचं प्रभुत्व आहे. त्यामुळे या चौरंगी लढतीत कोण कोणाचा खेळ बिघडणार ते पाहावं लागेल.


गडचिरोलीत भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ नामदेव किसरान यांच्यात लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे हितेश मढावी यांना रिंगणात उतरवलंय.