`मी 2017 मध्येच कॅबिनेट मंत्री झाले असते, पण...` सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट
Loksabha Election: लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाला अवघा एक महिना उरला आहे. यावेळी सर्वाधिक लक्ष लागले आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे
Loksabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं निवडणुकीच्या आधीपासूनच बारामतीत राजकीय वातावरण तापलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच सुनेत्रा पवार यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. जर माझी विचारधारा मजबूत नसती तर 2017मध्ये मी देखील कॅबिनेट मंत्री असते, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
2017 मध्ये पंतप्रधान मोदींचा पहिला कार्यकाळ होता.सुप्रिया सुळे यांना 2019च्या राजकीय नाट्याबाबतदेखील सवाल करण्यात आले. 2019मध्ये राष्ट्रवादी खरंच भाजपासोबत जाणार होती की? यावर त्यांनी उत्तर दिलं की, त्याच्या कडुनच ऑफर आली होती त्यामुळे विचार करायला काय हरकत होती? पण माझी विचारधारा मजबूत आहे. जर असे नसते तर 2017मध्ये मी कॅबिनेट मंत्री असते. तेव्हा माझ्याकडे पर्याय होता आणि अजित पवार यांच्याकडे 2019मध्ये भाजपासोबत जाण्याचा पर्याय होता. मात्री मी संघर्षाचा मार्ग निवडला.
मतभेद मिटणार का?
अजित पवार यांच्यासोबतचे मतभेद मिटणार का? या प्रश्नावरही सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्यासोबतचे मतभेद आता मिटणे अशक्य आहे. जेव्हा एखादा पहिल्यांदा चुकी करतो तेव्हा समजून घेता येते. पण जर कोणी सतत एकच चुक करत असेल ती चुक नसून त्यांची निवड आहे. अशावेळी मतभेद मिटवून पुन्हा एकत्र येण्याची काहीच शक्यता नाही.आता त्यांच्याकडे त्यांचा गट आणि आमच्याकडे आमची लोक आहेत,असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांना किती धक्का बसला?
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांची काय अवस्था होती, या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ते कोणतीही परिस्थिती लगेचच स्वीकार करतात आणि पुढे जातात. ते खूप प्रॅक्टिकल आहेत आणि म्हणूनच त्यांना निर्णय घेण्यास सोपं जाते.
काँग्रेस मुक्त भारतचा नारा पण...
भाजपने काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला पण आता काँग्रेसपेक्षा जास्त काँग्रेसी भाजपामध्ये आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. त्याचबरोबर, बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझे काम चांगले आङे. मी केलेली विकासकामे माझ्या वेबसाइटवर आहेत. माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाहीये.