राष्ट्रवादी काॅंग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, महाराष्ट्रात धनंजय मुंडेंना सर्वात मोठी जबाबदारी
Ajit Pawar: महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंना जबाबदारी देण्यात आली आहे.
Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रायगडमधून सुनिल तटकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 28 मार्चला संपूर्ण उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. काही काळ बारामतीचा सस्पेन्स ठेवतोय. बारामतीत तुमच्याच मनातील उमेदवार जाहीर केला जाईल, अशी मिश्किल टीपणी यावेळी अजित पवार यांनी केली. मागे आम्ही 80 टक्के काम झाल्याचे सांगितलं होतं. आता 99 टक्के काम झालंय. पहिल्या टप्प्यातील उमेदवारा जाहीर केलेयत. 28 मार्चला स्टार प्रचारकांच्या याद्यादेखील जाहीर केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचां उमेदवार दोन दिवसात ठरणार आहेत. एनसीपीतील आमदारांना मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रचार नियोजन, महायुती उमेदवार तिथे समन्वयक ठरवण्यात आले आहेत. पाच टप्पे असून वेळ आहे. त्याचा चांगला वापर करा. सभेचे नियोजन करा,खोटा प्रचार रोखा, अशा सूचना अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदारांना देण्यात आल्या आहेत.
28 मार्चला महायुतीचे जागावाटप आणि इतर बाबींची माहिती त्यावेळी दिली जाईल.उद्यापण पुण्यात महत्वाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी आयोजित केल्या आहेत. महायुती जागावाटपाबाबत 99 टक्के काम झालय. 28 तारखेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी असे तिघे मिळून पत्रकार परिषद घेऊ. त्यावेळी राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करू, असे ते म्हणाले.
आजच दुसरी उमेदवारी
यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी जाहीर केली. रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आज आंबेगा मध्ये पक्षप्रवेश आहे. त्यावेळी दुसरा उमेदवार जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. मधल्या काळात कारण नसताना गैरसमज पसरवण्याचे काम केलं गेलं.यांना इतक्याच जागा मिळणार, तितक्यात जागा मिळणार वगैरे...असं बोललं गेलं. गेल्या वेळी जागावाटपात जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढया मिळाव्यात असा आग्रह मित्रपक्षांचा होता. याबाबत सर्वांमध्ये विचारविनियम झाल्याचे ते यावेळी म्हणाले.
उदयनराजेंबद्दलचा निर्णय
बारामतीचा उमेदवार कोण याबद्दल सस्पेन्स ठेवलाय पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव 99 टक्के असणार आहे, असे पवार म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल इतक्या जागा आम्ही मागितल्या आहेत.साताऱ्याबाबतचा निर्णय 28 तारखेला सांगू. तोवर उदयन राजे यांना भाजपचे नेते समजून सांगतील, असे ते म्हणाले.
गोगावलेंना दिलं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी केली. यावर अजित पवारांनी उत्तर दिले. खाली कार्यकर्ते मत मांडतात. निर्णय वर नेते घेतात. राष्ट्रवादी प्रमुख म्हणून मी, शिवसेना प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे, रासप प्रमुख म्हणून जानकर आणि भाजपमधून फडणवीस, अमित शहा हे निर्णय घेत असतात. यापेक्षा कोण दुसरं असेल तर मला सांगा? असा प्रश्न त्यांनी विचारला.