Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय प्रस्थांना हादरा मिळाला. देशात एनडीएला (NDA) बहुमताचा आकडा गाठता आलेला नसतानाच महाराष्ट्रातही भाजपला दणका मिळाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह महाराष्ट्रात मविआला (MVA) मिळालेला कौल पाहता, आता पराभवाची नेमकी कारणं महायुतीच्या बैठकांमध्ये चर्चेचा विषय ठरणाक आहेत. या साऱ्यामध्ये केंद्रस्थानी असणारा एक मुद्दा म्हणजे अजित पवार आणि त्यांच्या वाट्याला आलेला पराभव. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीतून वेगळं होत भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांनी विजयाचा दावा करत बारामतीतून (Baramati Loksabha Election) सुनेत्रा पवार यांना निवणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. पण, बारामतीकरांनी मात्र थोरल्या पवारांना अर्थात शरद पवार आणि त्यांची लेक, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कौल देत पुन्हा एकदा विश्वास सार्थ ठरवला. 


घरच्याच मैदानावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पराभव पाहायला मिळाला असून आता सुनेत्रा पवार यांचा पराभव नेमका का झाला, याची काही कारणं समोर येताना दिसत आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, घरातील उमेदवार उभा करून घर फोडल्याबद्दलची मतदारांमध्ये असलेली नाराजी. आणखी एक कारण म्हणजे, पक्ष फोडून शरद पवारांची साथ सोडल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विषयी मतदारांच्या मनात सहानुभूतीची भावना होती. ज्यामुळं त्यांना मतदारांची साथ मिळाली. 


लेकीचं नेतृत्त्वं


खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघातील सातत्यपूर्ण संपर्क आणि निवडणूक काळात घेतलेली मेहनत हे या विजयाचं गमक ठरलं. त्याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याकडील नेतृत्व, वक्तृत्व आणि संसदरत्न म्हणून त्यांना असणारी मान्यता ही त्यांच्या विजयाची आणखी काही कारणं. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : राजं जिंकलं...! कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव


 


विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील या नेतेमंडळींनी निवडणुकीआधी घेतलेल्या विरोधी भूमिकांमुळं मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यात भर पडली ती म्हणजे खुद्द पवार कुटुंबातील काही सदस्यांची. पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी जाहीरपणे अजित पवार यांच्या विरोधात घेतलेली भूमिका पराभवाचं निमित्त ठरली असंही अनेकांचं मत. 



फोडाफोडीचं राजकारण...


आपण ज्या गटात आहोत तिथूनच शरद पवारांच्या पराभवाची भाषा केली जाणं अजित पवार गटाला बारामतीत भोवलं. अर्थात, भाजप नेते चंद्रकांत पाटील 'बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा आहे' ही अशी वक्तव्य इथं कारणीभूत ठरली. बारामती आणि खडकवासला मतदारसंघातून अजित पवारांना अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाविषयीचा राग मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आला. 


अजित पवार गटाविषयीच्या नाराजीमध्ये भर पडली ती म्हणजे मतदानाच्या दिवशी करण्यात आलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांची. एकंदरच परिस्थितीनंच अजित पवार यांची साथ दिली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यांना पराभव पचवावा लागला.