LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले. या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपल्याकडून नावं सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता. पण यावेळी अनेकजण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समजाला गावागावात बैठका घेऊन, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याचं आवाहन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीगरमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही बैठक आयोजित करण्यावरुनच वाद झाला. बैठक कोणी आयोजित केली यावरुन उपस्थिांमध्ये वाद झाला. दरम्यान यावेळी काहींनी उमेदवारीसाठी नावं घेण्यास सुरुवात केल्यानंतर हा वाद आणखी वाढला. कोणीही उमेदवारीसाठी नावं सुचवायची नाहीत असं ठरल्यानंतरही नावं घेतल्यानं शाब्दिक वाद झाला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं. 


बैठकीत उपस्थित एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांची सकल मराठा समाजातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोणीतरी आपल्या व्यक्तीचं नाव सुचवत होतं. सर्वसमावेश उमेदवार द्यायचा असं आमचं ठरलं होतं. जास्त नावं झाली तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं आणि ते अंतिम निर्णय घेतील असं ठरलं होतं. पण येथे काही नावं घेत बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला आणि वाद झाला. 


दुसऱ्या एका कार्यकर्त्याने हा वाद फार दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली आहे. "फोनवरुन अचानकपणे या बैठकीचं आयोजन कऱण्यात आलं होतं. पण हेतूपरस्पर नावं घेतल्याने हा वाद झाला. पण वैचारिक लढण्याऐवजी अशाप्रकारे हाणामारी होणं दुर्देवी आहे". बैठक दोन ते तीन दिवस आधी बैठक आयोजित करायला हवी होती. तालुक्यातील सर्व लोकांना बोलावलं पाहिजे असं एकमत होतं आणि यावरुन वाद झाला असंही त्यांनी सांगितलं.


मनोज जरांगे पाटील यांचं अपक्ष उमेदवार देण्यासाठी आवाहन


मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येत जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा पर्याय दिला आहे. गावोगावी सगळ्यांनी मराठा बांधवांशी बोलून मतं जाणून घ्यावी आणि अंतिम निर्णय घ्यावा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. गावातील लोकांच्या निर्णयाबाबत माहिती मिळाल्यानंतर अखेरचा निर्णय जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.