LokSabha Election: लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून महायुतीमध्ये काही जागांवरुन तिढा निर्माण झाला होता. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश होता. पण अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असून, भाजपाने नारायण राणेंच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे नारायण राणे हेच महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद देत माघार घेत असल्याचं जाहीर केलं. पण अचानक नेमकं असं काय झालं की, इतके दिवस दावा करणाऱ्या शिंदे गटाने येथून माघार घेतली? उदय सामंत यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा सुरु आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाबात 8 दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर भाजपाच्या एका नेत्याने त्या संदर्भातील निर्णय थोड्या दिवसांनी घ्यावा अशी विनंती केली होती. त्यामुळे काल संध्याकाळपर्यंत यासंदर्भात चर्चा सुरु होती," अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.


"मीदेखील 4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनुष्यबाणाला ही जागा मिळावी अशी विनंती केली होती. तसंच किरण सामंत यांच्या नावासाठी आग्रह करत सर्व आकडेवारी सादर केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो होतो. काल रात्री पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अमित शाह या सर्वांशी चर्चा झाली," असं उदय सामंत यांनी सांगितलं. 


माघार का घेत आहोत याचा उलगडा करताना उदय सामंत यांनी सांगितलं की, "तिकीट वाटपावर चर्चा सुरु असताना उद्या फॉर्म भरण्याची वेळ आहे. अशा स्थितीत अद्यापही उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या बैठकांनंतर एकनाथ शिंदे, फडणवीस यांना त्रास होऊ नये यासाठी किरण सामंत यांनी नारायण राणेंना जरी उमेदवारी जाहीर झाली तरी शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करु अशी भूमिका घेतली आहे. नारायण राणे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत. आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी, उद्या फॉर्म भरताना नाराणय राणेंसह उपस्थित असू". 


अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शब्द फुकट जाऊ नये आणि महायुतीत तेढ निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनाने हा निर्णय घेतल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणात थांबलो आहोत असं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीत किरण सामंत यांचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.