आता `पार्थ`ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह
मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
मावळ : मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा मावळमध्ये पोहोचली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते या कार्यक्रमात उपस्थीत होते. यावेळी विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांच्या उमेद्वारी देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावरून केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरु आहे. पण आत्तापर्यंत अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्यानं यावर भाष्य केलं नव्हतं. यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच उघडपणे अशी मागणी केली आहे. पार्थ पवार हे शरद पवारांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
शरद पवारांच्या नकारानंतर पार्थच्या उमेदवारीबाबत अजितदादांचे सूचक वक्तव्य
दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या मावळमधून निवडणूक लढवण्याबाबत प्रतिकुलता दर्शवली होती. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?, असा सवाल शरद पवार यांनी विचारला होता. यानंतर अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. 'अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत', असं अजित पवार म्हणाले होते. आणि आता पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्या नावाची धनंजय मुंडेंनी शिफारस केली आहे, त्यामुळे आता शरद पवार यांचं मतपरिवर्तन होणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
'पार्थ नाही, शरद पवार नाही, मीच लोकसभा लढवणार'