राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले - रघुनाथ पाटील
खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले, अशी बोचरी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी केली.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले. या पक्षातून त्या पक्षाकडे जायचे, या त्यांच्या माकड उड्या सुरू आहेत, अशी बोचरी टीका करत नेहमी कोलांट्याउड्या मारणाऱ्यांना यावेळी धोका आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी दिला आहे. त्याचवेळी आपण या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहत असल्याचे स्पष्ट केले.खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं काय केले आहे? त्यांनी मतदारसंघाचे वाटोळे केले आहे. भाजप आणि काँग्रेस विरोधात वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय निर्माण झाला, असून, प्रकाश आंबेडकर, ओवेसी, शेतकरी संघटनेचे नेते आणि धनगर समाजाचे नेते एकत्र आल्याने मोठी ताकत निर्माण झाली आहे, असे रघुनाथ पाटील म्हणालेत.
राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. १२२ आमदार असलेल्या भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाच पाठिंबा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात तर भाजप आणि काँग्रेसची नुरा कुस्ती आहे, असा आरोपही रघुनाथ पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. देश बुडवण्याचे काम अगोदर काँग्रेस आणि आता भाजप करत आहे. काँग्रेसवर कडी करत भाजपने अनेक घोटाळे केले आहेत. भाजप असो किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा बाजूला केला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.