मुंबईत सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंचा मनसे पक्ष कोणत्याही क्षणी महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक सुरु आहे. वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये ही बैठक सुरु आहे. दिल्लीत अमित शाह यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर होणारी ही दुसरी महत्त्वाची बैठक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असून, त्यांना लोकसभेच्या 2 जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. पण भाजपा मात्र त्यांना एकच जागा देणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान महायुतीत सहभागी होताना कोणत्या अटी असतील यावर सगळं अवलंबून असणार आहे. 


मनसेला महायुतीत किती जागा मिळतील? तसंच आमागी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये काय रणनीती असेल यावरही राज ठाकरे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी विनोद तावडे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते. "दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली. अमित ठाकरेही सोबत होते. महायुतीत सहभागी होण्यासंबंधी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आणखी एका बैठकीनंतर यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या सकारात्मक चर्चा झाली इतकंच सांगू शकतो," अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.