वसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले `नव्या राजकारणाची सुरुवात...`
Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा सुरु होती. दरम्यान आपल्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती वसंत मोरे यांनी भेटीनंतर दिली आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी आपण आता चर्चा उघड करणार नाही असं सांगितलं आहे.
पाऊण तासांच्या भेटीनंतर वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "वंचितचे सर्वेसर्वो प्रकाश आंबेडकर यांनी मला येथे बोलावलं आणि इतका वेळ दिला. यादरम्यान चांगली चर्चा झाली. आगामी दिवसात मोठ्या स्तरावर चर्चा होईल. चौथा टप्पा दूर असून, सध्या सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढील मार्गक्रमण कसं असेल याबद्दल 2 ते 4 दिवसात समजेल. चर्चा सकारात्मक झाली असून. त्याचं फलित लोकसभेचा खासदार या विचारातून होईल याची खात्री आहे", असं वसंत मोरे म्हणाले आहेत. वंचिकडून निवडणूक लढणार का? असं विचारण्यात आलं असता प्रकाश आंबेडकर याबाबत निर्णय घेतील असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, "वसंत मोरेंसह चर्चा झाली आहे. पण महत्त्वाची चर्चा अद्याप बाकी आहे. 31 तारखेपर्यंत यासंबंधी अधिकृत माहिती दिली जाईल. नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण करणार आहेत याबद्दल तेव्हा सांगण्यात येईल. काही चर्चा मी उघड करु शकत नाही. घटना अजून घडत असताना त्यावर बोलणं योग्य नाही. 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रातील समीकरण, चित्र स्पष्ट होईल".
"ग्रामीण आणि शहर पातळीवर जे सुरु आहे त्याबद्दल आता बोलू शकत नाही. मला 4 दिवसांची मुदत द्या. त्यानंतर मी सर्व स्पष्ट करतो," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत आवाहन होत असताना त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं स्पष्ट केलं.