मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लूट, तिघांना घेतले ताब्यात
नवी मुंबई आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पनवेल गुन्हा अन्वेषण विभागानं मोठ्या शिताफीनं पकडलंय.
मुंबई : नवी मुंबई आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पनवेल गुन्हा अन्वेषण विभागानं मोठ्या शिताफीनं पकडलंय. दिल्लीतून तीन जणांना ताब्यात घेतलंय. गेल्या एक ते दीड महिन्यात या टोळीनं धुमाकूळ घातला होता. कारमध्ये लिफ्ट देऊन बंदुकीचा धाक दाखवून दागिने आणि एटीएम आणि क्रेडीट कार्डवरील रक्कम लुटायचे.
या सारख्या कार्यपद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत सहा जणांना लुटल्याचं समोर आलंय. नवी मुंबईतील तीन जण, ठाण्यातील एक आणि पुण्यातील एक जणाची तक्रार आहे. पुण्यातील स्टेट बँकेचे वरीष्ठ व्यवस्थापक सुधीर जालनापुरे पुण्याहून मुंबईत येताना चार लाखांना लुटलं आहे.
झी २४ तासचे वृत्त निवेदक गिरीश निकम,वाशीतील एमटीएमएल कार्यालयातील एक कर्मचारी तसंच नेरुळ, ठाण्यातील अभियंत्याना या टोळेने लुटलंय. या टोळीनं वाशीतून पांढऱ्या रंगाची ऍसेन्ट कार चोरली होती. ड्रायव्हरला चहातून गुंगीचं औषध देऊन त्याला पुण्यात रस्त्यावर टाकून दिलं. पुढे या कारमधूनच नंबर प्लेट बदलून गुन्हे केले होते.