परभणी : हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार केल्याची घटना घडली असतांना परभणी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडलाय. लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा निर्घृन खून केल्याची घटना मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात घडली. ही महिला ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या टोळीतली आहे. ती हरवल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. मात्र तिचा मृतदेह सापडला. या महिलेचे विवाहाआधीचे प्रेमसंबंध होते. लग्नानंतर तिनं प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून संजय ऊर्फ पप्पू रमेश जोंधळे याने तिचा शेतात खून केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊसतोड करणाऱ्या टोळीतील एका महिलेचे विवाहापूर्वीचे प्रेमसंबंध अखेर तिची जीवनयात्रा संपविण्यास कारणीभूत ठरले. मोबाईलवरून प्रियकराला यापुढे प्रेमसंबंधास नकार देतांनाच शेवटची भेट घेण्यास बोलवलेल्या प्रेयसीला आपला जीव गमवावा लागला.परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपूरी शिवारातील ऊसाच्या शेतात दुर्गंध येत होती. त्याठिकाणी शोध घेतल्यानंतर एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 


सापडलेली महिला ऊसतोड कामगारांच्या टोळीतील होती. ती काही दिवसांपूर्वी हरवलेली असल्याचे पोलिसात तपासात निष्पन्न झाले. त्यावरून मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणाचा तपास मानवत पोलिसासोबतच स्थानिक गुन्हा शाखा करत होती. महिलेच्या नातेवाईकांकडून विवाहितेचे संबंध लग्नापूर्वी अन्य व्यक्तीशी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयीत संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्या महिलेशी विवाहपूर्व संबंध असल्याचे कबुल केले. 


फोनवरील संपर्कातून विवाहितेने त्याला यापुढे संपर्क ठेवणार नसल्याचे सांगून शेवटचे रामपूरी शिवारात भेटून जा, असा निरोप दिला होता. तो त्या महिलेस भेटण्यास आल्यानंतर यापुढे ती प्रेमसंबंध ठेवणार नाही याची त्याला खात्री झाल्याने संजयने आपल्या प्रियसीच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्यावर शस्त्राने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला, अशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


ऊस टोळीवरील विवाहिता एक फेब्रुवारीपासून हरवल्याची तक्रार मानवत पोलीस ठाण्यात दिली होती. घटना स्थळावर तिची साडी सापडली. त्यावरुन तिच महिला असावी असा अंदाज पोलिसांनी लावला आणि मोबाईलच्या रेकॉर्डवरून तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या.