एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ऍसिड हल्ला
२० वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला
गोंदिया : एकतर्फी प्रेमाला विरोध केल्यामुळे एका २० वर्षीय तरुणीवर ऍसिड फेकल्याची दुर्दैवी घटना गोंदियाच्या खळबंधा गावात घडली. या घटनेमुळे सध्या परिसरात अनेकांना धक्का बसला आहे. पीडिता बसची प्रतीक्षा करत असतानाच आरोपी प्रियकराने कारच्या बॅटरीमधील ऍसिड काढून तिच्यावर फेकलं.
एकतर्फी प्रेमातून करण्यात आलेल्या या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. सध्याच्या घडीला तिच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी राहुल नन्हेंद आणि त्याचा सहकारी खोमेन्द्र जगणित याला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणी ही नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. तर, आरोपी राहुल याचं अभियंत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तर, त्याचा सहकारीदेखील पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असल्याचं कळत आहे. हे दोन्ही आरोपी उच्च शिक्षित आहेत. एकिकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि ऍसिड हल्ले यांसारख्या घटनांचं प्रमाण कमी करण्यासाठी न्यायव्यवस्थेकडून काही कठोर पावलं उचलली जाण्याची मागणी होत आहे. तर, दुसरीकडे दिवसागणिक अशा घटनांनी समाजाला हादरा बसत आहे.