कुणाल जमदाडे, झी मीडिया, नाशिक :  नगर जिल्ह्यात (Nashik) कांदा काढणीची कामं सुरू आहे. कांदा काढणारे मजूर डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याची तक्रार करतायेत. नेत्रतज्ज्ञांकडे डोळ्यांची तपासणी केली असता त्यांच्या डोळ्यात चक्क अळ्या तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नाशिकसह  जिल्हाभरात कांदा काढणीची कामे सुरु असून नगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अनेक भागांत उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. अवकाळीमुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला. त्यात आता एका नव्या संकटाची भर पडली आहे. शेतकऱ्यांना सध्या डोळ्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. डोळ्यात अळ्या होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करू लागलेत आहेत. माशीची अंडी डोळ्यांत गेल्यानं हे होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 


कांदा मजूर भयभित


अनेक मजूर कांदा काढणी (Onion farm) करत असून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजपर्यंत उत्तर भारतात आढळत असलेली कांदा पिकातील कीड महाराष्ट्रात आढळली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कांद्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या डोळ्यात अचानक अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.


माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसूण या दोन पिकांवर असते


माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसून या दोनच पिकांवर असते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पाकळीत आपले अंडी घालत असते. तीच अंडी कांदा काढत्यावेळी मजुरांच्या डोळ्यात गेली आणि त्यातूनच अळ्या निघण्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामध्ये शेतक-यांनी घाबरून जाण्यासारखे काहीही नसून काढणीच्या वेळी काळजी घेण्याची गरज असल्याच स्पष्ट केल आहे. ही कांदा पिकातील कीड यापूर्वी उत्तर भारतात आढळायची परंतु आता अशी कीड महाराष्ट्रात दिसून आली असून यातून घाबरून न जाता काढणीच्या वेळी योग्य ती खबरदारी घेणं महत्वाचं आहे. 


शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी


कांदा काढणीनंतर डोळ्यांना त्रास होत असल्याने नगर जिल्ह्यातील शेतकरी धास्तावलेत. मात्र शेतक-यांनी घाबरून जाऊ नये. हा फारसा गंभीर आजार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. डोळ्यांना जळजळ होत असेल किंवा डोळे दुखत असल्यास शेतक-यांनी तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि लवकरात लवकर उपचार करून घ्यावेत. ज्या कांद्याच्या शेतामध्ये जास्त दाट प्रमाणात लागवड झालेली असेल अशा शेतात शक्यतो कांदा काढत असताना आपल्या डोळ्यांवरती गॉगल्स घालावे. त्याचबरोबर तोंडावरती आणि नाकावरती रुमाल बांधायला हवा की जेणे करून हवे बरोबर नाकावाटे तोंडावाटे हे कांदा पिकांवरील घातक घटक शरीरामध्ये जाणार नाही.