महाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण, अपघाताला जबाबदार कोण ?
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. वर्ष झालं तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.
प्रफुल्ल पवार, महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. वर्ष झालं तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.
हा दिवस कोकणवासियांसाठी काळा दिवस ठरला. याच रात्री मुसळधार पावसामुळे सावित्री नदीनं रौद्र रुप धारण केलं होतं आणि त्यामुळे सावित्री नदीवर असणारा मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेला होता. यात जवळपास 40 जणांना जलसमाधी मिळाली होती. तब्बल 13 दिवसांच्या शोधकार्यानंतर वाहनांच्या सांगाड्यासह 30 जणांचे मृतदेह हाती लागले. दुर्घटनेनंतर तातडीनं या ठिकाणी नवीन पूलाचं काम हाती घेण्यात आलं आणि अवघ्या 165 दिवसात नवीन पूल उभारुन वाहतुकीसाठी खुलादेखील करण्यात आला.
या दुर्घटनेनंतर देशभरात ब्रिटिशकालीन पूलांचा मुद्दा चर्चेला आला. या अपघातामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर चौफेर टीका होवू लागली. त्यामुळे सरकारनं अपघाताच्या चौकशीसाठी आयोगाची नेमणूक केली. निवृत्त न्यायाधीश न्यामूर्ती एस. के. शहा आयोगानं दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली मात्र आयोगाचा अहवाल अद्याप शासनाला सादर झालेला नाही.
देशभरात अजून कित्येक ब्रिटिशकालीन पूल आहेत. ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडीट अद्याप झालेलं नाही आहे. सावित्रीच्या या दुर्घटनेत अनेकांनी आपल्या रक्ताच्या नात्यांतील माणसं गमावली आहेत. त्यातील 10 जणांचे मृतदेह आजही हाती लागलेले नाहीत.