Ajit Pawar vs Sharad Pawar:  शरद पवार, अजित पवार यांना उद्या निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र उद्या या सुनावणीला शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार गटाने 9 हजार शपथपत्र आयोगाकडे सादर केलीयत. अजित पवारांच्या गटाने 5000 शपथपत्र दाखल केली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. उद्या आयोगासमोर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. समर्थन देणा-या आमदारांची संख्या जास्त असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हं याबद्दल चिंता करायची आवश्यकता नाही असा विश्वास शरद पवारांना वाटतो. निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कुणाची यावर सुनावणी सुरु होतेय, त्याच पार्श्वभूमीवर हे विधानं महत्त्वाचं मानलं जातंय. सुनावणीच्या आदल्या दिवशी  पवार गटानं मोठी खेळी खेळलीय. दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन शरद पवारांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केलं. या बैठकीला 24 प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.  निवडणूक आयोगासमोर दोन्ही गट आपली बाजू मांडणार आहेत.


शरद पवारांनी निवडणूक आयोगासमोर काय दावा केलाय? 


शरद पवार गटाने अजित पवार गटावरच आक्षेप घेतला आहे.  शरद पवारांच्या अध्यक्षपदाला भुजबळ, अजित पवार प्रस्तावक आहेत. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंचीही प्रस्तावक म्हणून सहमती आहे. शरद पवार गटाकडून समर्थनाची 9 हजार शपथपत्र सादर करण्यात आली. 


अजित पवार गटाकडून काय दावा करण्यात आलाय?


अजित पवार गटाला समर्थन देणा-या आमदारांची संख्या अधिक आहे.  विधानसभा, विधानपरिषद आमदार प्रतिज्ञापत्र देणार. शरद पवारांची निवडणुकीद्वारे अध्यक्षपदी निवड नाही. अजित पवार गटाकडून 5 हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेत. 


कुणाकडे किती आमदार आणि खासदार? 


अजित पवार गटाकडे 40 तर, शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. अजित पवार गटाकडे दोन खासदार आहेत. शरद पवार गटाकडे सहा खासदार आहेत.


शरद पवार गटाची निवडणूक आयोगालाच कोंडीत पकडण्याची खेळी 


दुसरीकडे शरद पवार गट निवडणूक आयोगालाच कोंडीत पकडण्याची खेळी खेळणार असल्याचं समजतंय.. निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र किती असा प्रश्न शरद पवार गटाने विचारलाय. तसंच पक्षात कोणतीही फूट पडलेली नसल्याचं शरद पवार गट वारंवार सांगत आलाय. तरीही सुनावणीसाठी का बोलावलं असा प्रतिसवालही शरद पवार गट आयोगाला करणार आहे.. पक्ष आणि चिन्हाबाबतच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानेही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. तेव्हा शरद पवार गटही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता दिसतेय.


अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा  जयंत पाटील यांचा दावा  


अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय.. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारासोबत माझी चर्चा झाली. आम्ही मनापासून शरद पवारांसोबत आहोत. सध्या थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे राहतोय, असं आमदारांनी सांगितल्याचं जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितलं.