स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र्र भूषण कार्यक्रमात (Maharashtra Bhushan Award)झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा चौदावर गेला आहे.  या कार्यक्रमाला राज्यभरातून श्रीसदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. भर उन्हात लाखोंची गर्दी जमली होती. पण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना उन्हाचा त्रास झाला. दुर्देवी उष्माघाताने (Heatstroke) 14 जणांचा मृत्यू झाला. काही जण रात्रीपासूनच तर काही जणं पहाटेपासून या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत (Navi Mumbai) जमले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू
या दुर्घटनेत आज आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. विरारमध्ये राहाणाऱ्या स्वाती वैद्य असं मृत महिलेचं नाव असून त्या 34 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर वाशीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज त्यांचा मृत्यू झाला. भर उन्हात कार्यक्रम झाल्यानंतर अनेक सदस्यांना चक्कर येणे, उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. अनेकांना वाशीतल्या एमजीएम रुग्णालय, नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय, नेरुळ इथलं डी वाय पाटील रुग्णालय तसेृंच खारघरमधल्या टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 


ढिसाळ नियोजनाचे बळी?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. उष्माघात आणि गर्दीच्या नियोजनाअभावी ही दुर्घटना घडल्याचं मानलं जातंय. गर्दीमुळं अस्वस्थ लोकांना बाहेर काढणं कसं मुश्कील झालं होतं. महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील बळींची संख्या 14 वर पोहोचलीय. ढिसाळ नियोजनामुळं ही दुर्घटना घडल्याचं या व्हिडिओवरून स्पष्ट होतंय.


अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
'महाराष्ट्र भूषण' सोहळ्यातील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार यांनी केलीय. तसंच या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा, अशीही मागणी अजित पवारांची आहे. अजित पवारांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय.  मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह 5 लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 


काय घडलं नेमकं?
खारघर इथं ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी जवळपास 20 लाख श्री सदस्य उपस्थित असल्याची माहिती आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उपस्थितांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर अतिउष्णतेमुळे काही नागरीक आजारी पडले. उन्हाचा तडाखा बसल्यानं काही नागरिकांना चक्कर आली. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. राज्यात सध्या  पारा 40 अंश सेल्सियसच्या वर आहे. त्यातच उन्हाच्या ताडख्यात नागरीक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आले होते.