दीपक भातुसे, झी मी़डिया, मुंबई : ग्रामपंचायत आणि राज्य शासनातील महत्त्वाचा दुवा असलेले ग्रामसेवक मागील सात दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. राज्यात 22 हजार ग्रामसेवक कार्यरत असून हे सर्व ग्रामसेवक संपावर गेल्यानं राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. राज्यातील 27 हजार 854 ग्रामपंचायतींच्या कामावर या संपाचा परिणाम झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामसेवक पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे या मागणीसह अन्य सात मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या चाव्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करून राज्यातील ग्रामसेवकांनी संप सुरू केला आहे.


आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना देऊन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने संपाची हाक दिली होती. मात्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हे ग्रामसेवक सात दिवसांपासून संपावर आहेत. 



काल या संपाबाबत ग्रामसेवक संघटनांची सरकारबरोबर चर्चाही झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने दिला आहे.