अमरावती : अमरावती शहरात २८ जुलै २०२० रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथल्या एका रुग्णालयातील लॅब टेक्निशियनने कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं सांगत एका युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतले होते. या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या धक्कादायक घटनेनंतर बडनेरा पोलिसांनी लॅब टेक्निशियन अलकेश देशमुख विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवत 15 महिन्यानंतर निकाल दिला आहे. आरोपी अलंकेश देशमुख याला 10 वर्ष सक्षम कारावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली.


नेमका काय होता प्रकार?
पीडित तरुणी नोकरीनिमित्ताने अमरावतीत आपल्या भावाकडे राहत होती. कार्यालयात सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने २८ जुलै २०२० ला पीडित तरुणी कोरोना चाचणीसाठी रुग्णालयात गेली. काही दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं सांगत आरोली अलकेशने पुन्हा रुग्णालयात बोलावलं.


पुन्हा टेस्ट करावी लागेल असं सांगत आरोपी अलकेशने तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतले. पण पद्धतीने नमुने घेतल्याबद्दल शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी तात्काळ डॉक्टरांकडे चौकशी केली. डॉक्टरांनी अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं सांगितलं.


यामुळे धक्का बसलेल्या पीडित तरुणी आणि तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सखोल चौकशी करत अलपेशला अटक केली. त्यानंतर आता न्यायालयाने अलकेशला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.