`राज ठाकरे तर कधी काय...`, अजित पवारांचा टोला; `पक्ष चोरला` टीकेवर स्पष्टच बोलले
Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray: राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेला अखेर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक सभांमधून निशाणा साधल्यानंतर आता अजित पवारांनी राज ठाकरेंना खास त्यांच्या शैलीमध्ये निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतरच्या संघर्षावर बोलताना राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये अजित पवारांवर टीका केली. या टीकेवर अजित पवारांनी इंदापूरमधील जाहीर सभेतून प्रतिक्रिया नोंदवली.
राज ठाकरेंनी काय टीका केली?
4 नोव्हेंबर रोजी ठाण्यामध्ये मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी, "महाराष्ट्रात फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा पक्ष फोडले. पण गेल्या ५ वर्षात कळस गाठला. गेल्या ५ वर्षात आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं म्हणत टीका केली होती.
नक्की वाचा >> पूनम महाजनांचं खळबळजन विधान: गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?
वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्यं
याच टीकेवरुन अजित पवारांनी आधी खोचकपणे टीका केली. "काहीकाही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्यं चालवली आहेत. काही जण म्हणतात यांनी हे चोरलं, त्यांनी ते चोरलं. इथं चोराचोरी झालेली नाही. लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो. बहुमत ज्या बाजूला असेल त्या बाजूला निर्णय लागला जातो. निवडणूक आयोगाकडे त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतले आहेत. जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आमच्या विरोधकांकडून सुरु आहे," असं अजित पवार जाहीर सभेत म्हणाले.
नक्की वाचा >> 'नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी...', राज ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कितीवेळ बाहेर...'
थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत साधला निशाणा
त्यानंतर बुधवारी इंदापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत निशाणा साधला. "कोणीकोणाचं काही चोरलं नाही. त्यामध्ये आमदार, संघटना, संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यावर संघटना चालते. संघटना कोणा एकाच्या मालकीची नसते. काल मी कोल्हापूरला होतो तेव्हा उद्धव ठाकरे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे एकनाथ शिंदेंवर आरोप करत होते. राज ठाकरे तर कधी काय बोलतील सांगता येत नाही. मध्येच म्हणतील अजित पवार जातीवाद करत नाही. मध्येच आमच्याबद्दल काहीतरी बोलून जातील. त्या गोष्टीला फार तुम्ही महत्त्व देऊ नका. आपलं राज्य पुढे नेण्याची धमक कोणामध्ये? प्रशासनावर नियंत्रण कोणकडे आहे? लाथ मारेल तिथे पाणी काढेल याची हिंमत कोणामध्ये? कोण मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतं, कोण चांगल्या चांगल्या योजना देऊ शकतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे," असं अजित पवार म्हणाले.