Big Blow To MNS Chief Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 125 हून अधिक जागा लढवून त्यांना एकाही जागी विजय मिळवता आला नाही. या पराभव 'अविश्वसनीय' असल्याचं स्वत: पक्षाचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं. मात्र त्यानंतर या पराभवामागील कारणांचा शोध राज ठाकरेंकडून पराभूत उमेदवारांच्या बैठका आणि त्यांच्यासोबतच्या चर्चांमधून घेतला जात आहे. मुंबईपाठोपाठ काही दिवसांपूर्वी पुण्यातही राज ठाकरेंनी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी बैठका घेतल्या. मात्र एकीकडे हे प्रयत्न सुरु असतानाच राज ठाकरेंच्या एका निकटवर्तीयाने त्यांच्याकडे पदाचा राजीनामाचा सोपवला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या पक्षातही राजीनाम्यांचं सत्र सुरु होणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.


सगळेच उमेदवार पडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेनं मुंबई आणि उपनगरांमध्ये 42 उमेदवार उभे केले होते. यापैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे यात दादर-माहीम मतदारसंघात खुद्द राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा पराभव झाला. हीच स्थिती ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाली. मागील विधानसभेमध्ये मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे सुद्धा त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झाले. त्यामुळे पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच मनसेचा एकही आमदार विधानसभेत असणार नाही एवढी नामुष्की पक्षावर ओढावली आहे. असं असतानाच आता ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं अध्यक्षपद राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीकडे सोपवलेलं त्याने पदाचा राजीनामा देत पक्षाध्यक्षांनाच धक्का दिला आहे.


स्वत: हा नेता मोठ्या फरकाने पराभूत झाला


मनसेचे ठाणे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद आविनाश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र स्वत: अविनाश जाधव हे ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर यांच्याकडून पराभूत झाले. अविनशा जाधव निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांच्यापेक्षा जास्त मतं ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांना मिळाली. स्वत: पराभूत होण्याबरोबरच जिल्ह्यातून एकही उमेदवार निवडून न आल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.


राज ठाकरेंना लिहिलं पत्र


अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना राजीनामा देत असल्याचं पत्र पाठवलं आहे. "विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे" असं अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंकडे पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी पाठवण्यात आलं आहे. अविनाश जाधव हे मनसेचे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. रस्त्यावर उतरुन काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ठाणे-पालघरमध्ये ओळख आहे. त्यामुळेच त्यांनी दिलेला हा राजीनामा मनसेबरोबर राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.



आता राज ठाकरे हा राजीनामा स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.