खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडली 50000000 रुपयांची कॅश! राऊत म्हणतात, `शिंदेंनी निवडणुकीसाठी...`
Maharashtra Assembly Election 2024: खेड-शिवापूर टोलनाक्यावरील तपासणीदरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आचारसंहिता लागू होऊन एका आठवड्याचा वेळ उलटला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन चर्चा आणि बैठकींचं सत्र सुरु आहे. मात्र असं असतानाच सोमवारी खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ एका कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पैसे कोणाचे? कुठे नेले जात होते?
पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर जवळपास 5 कोटी रुपयांची रोख रक्कम तपास यंत्रणांच्या हाती आली आहे. कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या या पैशांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री ही रोख रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर ही रक्कम मोजायचं काम पहाटे चार वाजेपर्यंत. हे पैसे कोणाच्या मालकीचे आहेत? कुठे नेले जात होते? कोणाकडे पाठवले जात होते याची चौकशी सुरू आहे.
राऊत यांचं सूचक विधान
संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या कारवाईच्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. "मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी सापडले! (प्रत्यक्षात 5 कोटी रुपये) हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू... किती हे खोके?" अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे.
नक्की वाचा >> खेड-शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटींची कॅश सापडलेली कार कोणाची? वादात CM शिंदेंचा उल्लेख; 'त्या' चौघांना का सोडलं?
पुढील कारवाई होणार
जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत समाधानकारक खुलासा न होऊ शकल्यास गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई होईल, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस किंवा आयोगाच्या पथकाकडून या घटनेबद्दल अजूनपर्यंत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
प्रलोभनं दाखवण्याचा प्रयत्न
आचारसंहिता लागू असताना अशाप्रकारे गाड्यांमध्ये रोख रक्कम तपास यंत्रणांना सापडणं काही नवीन नाही. यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. निवडणूक काळामध्ये पैसे वाटपाच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याचे प्रयत्न केले जातात. असाच हा प्रयत्न आहे का यासंदर्भातील तपास आता सुरु करण्यात आला आहे.