Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित करताना, 'आमचे मुख्यमंत्री समोर बसले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे शरद पवारांनी जाहीर करावं असं मी त्यांना आव्हान देतो,' असं म्हटलं होतं. यावर महाविकास आघाडीकडून कोणतंही उत्तर आलेलं नसलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या रस्सीखेच फडणवीसांच्या निशाण्यावर होती हे स्पष्ट आहे. मात्र आता महायुतीमध्येही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित झालेला नसल्याचं दिल्लीमधील बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी मध्यरात्रीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


रात्री उशीरापर्यंत चालली बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले होते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत जागावाटपावर चर्चा झाली.



या बैठकीमध्ये महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळत असून काही जागांचा निर्णय प्रलंबित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच जोरदार प्रचाराची मोहीम सुरू होणार आहे. मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदासंदर्भात मोठा निर्णय तिन्ही घटकपक्षांनी घेतल्याचे समजते.



मुख्यमंत्रिपदाबाबात मोठा निर्णय


महायुतीचा मुख्यमंत्री निकालानंतरच ठरणार, असं भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निश्चित केलं आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यावर अद्याप निर्णय झाला नसून यासंदर्भात, 'महायुतीकडून कोणत्याही नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केला जाणार नाही याची काळजी घेतली जावी,' असे निर्देश अमित शहा यांच्याकडून तिन्ही नेत्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


नक्की वाचा >> Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?



महाविकास आघाडीचं 28 जागांवरुन अडलं


महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते. 


नक्की वाचा >> ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहा


दिल्लीत सुटणार मविआचा पेच?


ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत विदर्भातील रामटेक, अमरावतीसह काही जागा काँग्रेससाठी सोडल्या. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भातील काही जागांवर दावा केला जात आहे. दक्षिण नागपूर आणि रामटेक या नागपूर जिल्ह्यातील काही जागांसह विदर्भातील काही जागांवर वाद आहे.  त्या जागा सोडण्यास काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नसल्याने आता हा मुद्दा दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची शक्यता आहे.