Sanjay Raut On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा तर काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला आहे. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांना मिळून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या 57 जागांपर्यंतही पोहचता आलं नाही. या अपयशाची कारणं शोधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करण्याची मागणी महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या पक्षांकडून होऊ लागली आहे. असं असतानाच या शक्यतेवर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी 'मविआ'मधून ठाकरेंची सेना बाहेर पडणार की नाही याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे.


ठाकरेंच्या सेनेच्या पराभूत उमेदवारांचं म्हणणं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी स्वबळासंदर्भात सूचक विधान केल्याचं पाहायला मिळालं. "स्वबळावर लढावं असं पक्षातील बऱ्याच जणांना वाटत आहे. संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी असे करायला हवे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वाने ऐकून घेतले आहे. लगचे त्यावर प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही. इतकी घाई करायची आवश्यकता नाही," असं दानवेंनी म्हटलं आहे. पराभूत उमेदवारांची मातोश्रीवर बैठक झाली. पराभूत उमेदवारांनीच नव्हे तर विजयी उमेदवारांनीदेखील तक्रारी केल्या आहेत. अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत, असंही दानवेंनी यावेळेस सांगितलं. 


"स्वतंत्र लढलं पाहिजे असा अनेकांचा सूर आहे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केले आहे की शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे. शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केली आहे. ही महाविकास आघाडी आहेच. पण 288 मतदार संघात शिवसेना मजबूत झाली पाहिजे. लोकसभेला आम्ही एकत्र होतं. विधानसभेला काही ठिकाणं गणितं बदलली," असंही दानवे म्हणाले.


नक्की वाचा >> ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडण्याची...; प्रश्न ऐकताच हात जोडत फडणवीस म्हणाले, 'मला याची...'


मविआमधून बाहेर पडणार का?


प्रसारमाध्यमांनी संजय राऊतांना, ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न विचारला असता राऊतांनी क्षणाचाही विलंब न लावता, "अजिबात नाही," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना, "आताच निकाल लागले आहेत. निकालासंदर्भात अभ्यास, चिंतन, मंथन, अभ्यास सुरु आहे. तिन्ही पक्षांना धक्का बसला आहे. कारण शोधत आहोत. कारणांची दिशा ईव्हीएमकडे, पैसे वापरलेत त्या दिशेने जात आहे. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते की स्वतंत्र लढायला पाहिजे होते. पराभव झाल्यावर असं वाटतं. मात्र मुंबईसहीत 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यासंदर्भात निर्णय घ्यायाच आहे," असं म्हणाले.


नक्की वाचा >> पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'


"विधानसभा, लोकसभेला पाच वर्ष आहेत. राजकारणात घाईत निर्णय घ्याचेच नसतात. लोकसभेला आम्हाला एकत्र लढल्याचा फायदा झाला. विधानसभेच्या अपयशाची कारणं आम्ही एकत्र बसून शोधू. कार्यकर्त्यांच्या व्यक्तीगत भावना असता. भविष्याचा विचार केल्यास एकत्र बसूनच निर्णय घेऊ. जे निवडणूक पराभूत झाले त्याचं हे मत आहे. जे जिंकलेत त्यांचं हे मत नाही. जे पराभूत झाले ते कारणं शोधताना असं म्हणतात. आम्हाला जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुका आम्हाला लढायच्या आहेत," असंही राऊत म्हणाले.