Fadnavis On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकत्रितपणे 50 चा आकडाही गाठता आलेला नाही. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर या घटक पक्षांमधील धूसपूस समोर येत असतानाच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करण्यासंदर्भातील मागणी महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या पक्षांकडून होऊ लागली आहे. असं असतानाच या शक्यतेवर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे.
ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी स्वबळासंदर्भात सूचक विधान केलं आहे. "स्वबळावर लढाव असं पक्षातील बऱ्याच जणांना वाटत आहे. संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी असे करायला हवे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वाने ऐकून घेतले आहे. लगचे त्यावर प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही. इतकी घाई करायची आवश्यकता नाही," असं दानवेंनी म्हटलं आहे. काल पराभूत उमेदवारांची मातोश्रीवर बैठक झाली. पराभूत उमेदवारांनीच नव्हे तर विजयी उमेदवारांनीदेखील तक्रारी केल्या आहेत.अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत, असंही दानवेंनी यावेळेस सांगितलं. "स्वतंत्र लढलं पाहिजे असा अनेकांचा सूर आहे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केले आहे की शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे. शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केली आहे. ही महाविकास आघाडी आहेच. पण 288 मतदार संघात शिवसेना मजबूत झाली पाहिजे. लोकसभेला आम्ही एकत्र होतं. विधानसभेला काही ठिकाणं गणितं बदलली," असंही दानवे म्हणाले.
दानवेंच्या या विधानाचा संदर्भातून ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांना स्वबळावर लढण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ठाकरेंच्या पक्षाला मिळाली नसल्याने आगामी निवडणुका ते स्वबळावर लढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे, असं म्हणत फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच फडणवीसांनी हात जोडत, "मला याची काही कल्पना नाही," असं उत्तर दिलं. अन्य एका पत्रकाराने, 'भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा आहे,' असं म्हणत फडणवीसांकडे विचारपूस केली असता फडणवीसांनी, "ते आता आम्ही मिळवून ठरवू, त्याला वेळ आहे अजून," असं उत्तर देत तिथून काढता पाय घेतला.