`EVM गर्भार आहे` म्हणत राऊतांचा हल्लाबोल! म्हणाले, `राज्यात एक प्रकारची गूढ...`
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात किरकोळ कुरबुरी झाल्या, पण तुटेपर्यंत कोणीच ताणले नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024: "महाराष्ट्रात लागलेल्या आश्चर्यकारक निकालांवर चर्चा करणे म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखे आहे," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. ”मोदी-शहा दिल्लीत सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणुका लढवायला नकोत,” यावर आता सगळ्यांचेच एकमत होत आहे. निष्पक्ष निवडणुकांचा काळ संपला आहे हे भाजपच्या राजकारणास विरोध करणाऱ्या पक्षांनी समजून घेतले पाहिजे. 23 तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीस पोस्टल बॅलट (मतपत्रिका) मोजण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात 138 मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. सामना बरोबरीचा होता. 9 वाजता महायुती व महाविकास आघाडीत प्रत्येकी 137 जागांवर आघाडी दाखवत होते. बरोबर 10 वाजता आकडे बदलले. महाविकास आघाडी फक्त 53 व महायुती 211 असे उलटफेर झाले. निवडणुकांत हार-जीत होत असते. लोकशाहीचे हेच खरे स्वरूप आहे, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात जे घडले ती लोकशाहीची सरळ सरळ हत्याच आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार यांनी दोनशेच्या वर जागा जिंकल्या. या ’ईव्हीएम’ निकालावर विश्वास ठेवायला जनता तयार नाही. ’ईव्हीएम’ हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप आहे. हा शाप भारताचे अस्तित्वच नष्ट करेल की काय?" असा सवाल राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरातून व्यक्त केला आहे.
अमेरिका, युरोपसारखी राष्ट्रे मूर्ख व भारतात मोदी-शहा व त्यांचा भाजप तेवढा शहाणा
"जोपर्यंत ईव्हीएम हटवून बॅलट पेपरवर निवडणुकांची सुरुवात होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राप्रमाणे लोकशाहीची हत्या होतच राहील. अमेरिका, इंग्लंडसारखे आधुनिक सुधारणावादी देशदेखील त्यांच्या निवडणुकांत ईव्हीएमचा वापर करत नाहीत. 2006 साली नेदरलँडने ईव्हीएमवर बंदी आणली. 2009 साली रिपब्लिक ऑफ आयर्लंडने ईव्हीएमवर बंदी घातली. त्यापाठोपाठ इटलीनेही त्यांच्या निवडणुकांतून ईव्हीएमला काढून टाकले. मार्च 2009 मध्ये जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने ’ईव्हीएम’द्वारे मतदान हा एक घोटाळा असल्याचे जाहीर करून ईव्हीएमद्वारे मतदान बेकायदेशीर ठरवले. नॉर्वे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कोस्टारिका, फिलिपाईन्स, ग्वाटेमाला, बांगलादेशनेही ईव्हीएम वापरणे बंद केले. जपानसारख्या देशानेही 2016 पासून ईव्हीएमचे मतदान पारदर्शी नसल्याचे सांगून ’बॅलट’ पेपरवरच मतदान करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत एलन मस्क याने वारंवार जाहीर केले, ईव्हीएम हा जम्बो घोटाळा असून सर्व ईव्हीएम एकाच वेळी हॅक करून हवे तसे मतदान करून घेता येते. मस्कपासून अमेरिका, युरोपसारखी राष्ट्रे मूर्ख व भारतात मोदी-शहा व त्यांचा भाजप तेवढा शहाणा! महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, त्यानंतर देशातील निवडणूक प्रक्रियेवर कोणाचा विश्वास राहील असे वाटत नाही. त्याच ईव्हीएमची वकिली आता सुप्रीम कोर्ट करत आहे," अशी टीका राऊत यांनी केली आहे.
ईव्हीएमला गर्भ राहिला काय?
"महाराष्ट्रातील ’निकाल’ धक्कादायक आहे. लोकसभेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले तेव्हा ईव्हीएम घोटाळा झाला नाही काय? हा प्रश्न निरर्थक आहे. बॅलट पेपरवर निवडणुका घ्या ही मागणी गेल्या दहा वर्षांपासून सुरूच आहे. ईव्हीएम जिंकून आलेल्या अनेकांनी बॅलट पेपरवरच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञांनी फक्त 5 मिनिटांत ईव्हीएम हॅक करून दाखवली व हे प्रात्यक्षिक सगळ्यांनीच पाहिले. महाराष्ट्राच्या असंख्य मतदान केंद्रांवर भाजपने काय खेळ केला ते पहा," असं म्हणत राऊत यांनी चार मुद्दे मांडले आहेत. ते मुद्दे खालीलप्रमाणे
> 2014 साली मोदींची लाट होती हे लक्षात घ्या. तेव्हाही भाजपास इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या. या वेळी भाजपने 148 जागा लढवल्या व 132 जागा जिंकल्या. स्ट्राईक रेट 89 टक्के. हे शक्य आहे का?
> महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांनुसार मतदार यादीतून नावे वगळून त्या जागी ’बोगस’ नावे टाकली जात असल्याची ओरड सुरूच होती. आता असे दिसते की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर साधारण शंभर मतदान वाढवले. 400 बुथवर चाळीस हजार मतदान हे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वाढवून घेतले, असे दिसते.
> 20 नोव्हेंबरला मतदान झाले तेव्हा महाराष्ट्रात 5 कोटी 70 लाख लोकांनी मतदान केले होते. 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली तेव्हा 7 कोटी 70 लाख मते मोजली गेली. हे ’वरचे’ 2 कोटी मतदान आले कोठून?
> महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीत कसे बदल झाले? त्या आकडय़ांच्या जंतर मंतरवरही दुर्लक्ष करून चालणार नाही. 20 तारखेला 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के होती. त्यानंतर रात्री 11.30 वाजता ती टक्केवारी 65.02 टक्के झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतदानाची टक्केवारी 68.05 टक्के झाली.
राऊत यांनी पुढे, "म्हणजे फरक समजून घ्या. 6.80 % + 1.03 % = 7.83 % हे इतके मतदान वाढले कसे? ईव्हीएमला गर्भ राहिला काय?" असा सवाल उपस्थित केला आहे.
हा तर हिंदी सिनेमाचा रोमांचक शेवट
"महाराष्ट्रातील निकालांवर विश्वास ठेवता येत नाही व ईव्हीएम पूर्ण सेट केले आहेत याबाबत आता शंका उरलेली नाही. ईव्हीएमही सेट केले व न्यायालयही सेट केले. मग देशात उरले काय? शरद पवार यांनी लोकसभेला 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या. अजित पवारांना फक्त 1 जागा मिळाली. आता शरद पवारांना विधानसभेत 10 तर अजित पवारांना 41 जागा मिळतात हा हिंदी सिनेमाचा रोमांचक शेवट आहे," असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
गावात एकूण 514 मतं आणि भाजपाला पडली 557 मतं
"धुळे ग्रामीणमधून काँग्रेसचे कुणाल पाटील पराभूत झाले. त्या मतदारसंघातील अवधान गावातील लोक आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले. गावातील 70 टक्के लोक कुणाल पाटील यांच्या संस्थेत काम करतात. तेथे कुणाल पाटील यांना शून्य मते पडली. त्यामुळे संपूर्ण गाव निषेध करीत रस्त्यावर उतरले. कराड दक्षिण विधानसभेतील बुथ क्रमांक 164 वर एकूण मतदान 514 आहे. तेथे भाजपला 557 मते पडली," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
...म्हणजे विधानसभेसाठीच ईव्हीएम सेट केले
"नाशिक येथील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांनी सांगितले, ”माझ्या घरातच 65 मतदार, गावात कार्यकर्ते, पदाधिकारी मिळून 350 जण माझ्या बरोबर. पण मला फक्त 4 मते पडली.” संपूर्ण महाराष्ट्रात हेच घडवून निवडणूक हायजॅक केली. महाराष्ट्राची निवडणूक जनताच ताब्यात घेईल असे चित्र होते, पण ’ईव्हीएम’नेच निवडणूक हायजॅक केली. नांदेडला विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक झाली. लोकसभा काँग्रेस जिंकली, पण खालच्या सहा विधानसभेत भाजप जिंकला. एकही विधानसभा काँग्रेसने जिंकली नाही. म्हणजे विधानसभेसाठीच ईव्हीएम सेट केले होते," असा आरोप राऊतांनी केला आहे.
राज्यात एक प्रकारची गूढ...
"हरयाणात मतदान व मतमोजणीदरम्यान जे घडले तेच महाराष्ट्रात झाले. हरयाणात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 15 हजार मते वाढवण्यात आली व लोकशाहीने तेथेही शरणागती पत्करली. महाराष्ट्रातील निकालांनंतर काही अतिशहाणे महाविकास आघाडीला रोज शहाणपण शिकवत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत ताळमेळ नव्हता व नेते अति आत्मविश्वासात राहिले. त्यांनी मेहनत केली नाही. हे सर्वस्वी चूक आहे. विजयाला शंभर बाप असतात व पराभव बेवारस असतो. महायुतीचा प्रचंड पैसा, फोडा-झोडाचा खेळ, पोलीस, ईडीचे दबाव तंत्र, न्यायालयाची निपियता यावर कोणी बोलत नाही. जागोजाग ईव्हीएमविरोधात लोक पारी करत आहेत. त्यावरही हे गप्प. बॅलट पेपरवर निवडणुका घ्या असेही हे लोक ठामपणे बोलत नाहीत. पण शहाणपणा पाजळण्यात त्यांच्यात स्पर्धा आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात किरकोळ कुरबुरी झाल्या, पण तुटेपर्यंत कोणीच ताणले नाही. विदर्भात काँग्रेसचीच हवा असे काँग्रेसचे मत होते, त्याप्रमाणे त्यांनी विदर्भात मोठा वाटा घेतला. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली नाही असा आरोप करणे अन्यायकारक ठरेल. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचे तुफान उठवले होते. लोकसभेपेक्षा ही निवडणूक अधिक संघर्षाची आहे हे मान्य करून विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. पण निवडणूक यंत्रणाच विकली गेली. निवडणूक आयोगाने राज्य विकले. त्यामुळे झालेल्या मतदानापेक्षा काही लाख मते जास्त मोजली गेली. त्यामुळे निकाल फिरला. विधानसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण नाही. फडणवीस, शिंदे कसे जिंकले? हा प्रश्न जनतेला पडला आहे. राज्यात एक प्रकारची गूढ शांतता आहे! शांतता! ईव्हीएम गर्भार झाली! शांतता! ईव्हीएम हॅक झाली! शांतता! लोकशाही मरण पावली!" असं म्हणत लेखाचा शेवट केला आहे.