Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास आठवड्याभराचा काळ लोटला असला तरीही अद्यापही राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही. मताधिक्य असणाऱ्या महायुतीनं अद्याप सत्तास्थापनेचं समीकरण अधिकृतरित्या जाहीर न केल्यामुळं आता मुख्यमंत्री कोण? हाच प्रश्न सामान्यांच्या मनात घर करत आहे. इथं सातत्यानं हा प्रश्न विचारला जात असतानाच तिथं गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दरबारी महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेची खलबतं पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह महायुतीतील इतर महत्त्वाच्या नेत्यांची या बैठकीत उपस्थिती होती. सदर बैठकीनंतर काही छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आणि आता याच बैठकीतील पाच महत्त्वाचे मुद्दे सुत्रांच्या हवाल्यानं समोर आले आहेत. 


बैठकीत गाजलेले पाच मुद्दे 


  • मुख्यमंत्री भाजपचा. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब प्रतीक्षेत 

  • एकनाथ शिंदेंकडून महत्वाच्या खात्यांची मागणी 

  • बैठकीत अजित पवारांच्या मागण्यांवरही चर्चा

  • गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांवर चर्चा झाल्याची माहिती

  • शिंदे दादांच्या वाटेला काय येणार याबद्दल उत्सुकता कायम 


हेसुद्धा वाचा : ...त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवू; दिल्लीतील शाह, नड्डांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया



दरम्यान, दिल्लीतील बैठकीतही मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाली असली तरीही अंतिम तोडगा निघाला नसल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. अमित शाहांसोबत महायुतीचं दीड तास मंथन होऊनही मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब नाही. दरम्यान, दिल्लीतील या मोठ्या बैठकीनंतर आता शुक्रवारी मुंबईत महायुतीची आणखी एक बैठक पार पडणार आहे. 


मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आणि खातेवाटपावर चर्चा होणार असून, आता इथंतरी सत्तास्थापनेता तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असता तरीही 2 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असून, यादरम्यान काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.