विधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; `त्या` निर्णयाने खळबळ
Maharashtra Assembly Election Big Blow To Farmers: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 48 तास पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Assembly Election Big Blow To Farmers: विधानसभेच्या निकालानंतर शेतकरी तसेच दूध उत्पादकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दूध संघाने गाई दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त दूध उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघाने देखील गाईच्या दुधाच्या खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित जोडव्यवसाय असल्याने या फटका अनेक शतकऱ्यांना बसणार आहे.
दरांचं गणित कसं?
दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रमुखांची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार खाजगी व सहकारी दूध संघाचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर 30 रुपये करण्यात आहे आहे. दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी विक्रीचे दर याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता किमान प्रतिलिटर दर 28 आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये अश्या दराने गाय दूध खरेदी करत आहेत.
...म्हणून निर्णय
फक्त कोल्हापूर जिल्ह्यात 33 रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर 6 रुपये जास्त आहे. त्यामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किंमत जास्त येते असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. तसेच सध्या स्थितीत गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथून पुढे देखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल परंतु, दूध भुकटी व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतेही वाढ दिसून येत नाही. अश्या परिस्थितीत दूध खरेदी दर कमी करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही, असे या बैठकीत सर्वांचे एकमत झाले. त्यांनतर गाय दूध खरेदी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोणकोण होतं उपस्थित?
नव्या निर्णयानुसार गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता 33 ऐवजी 30 रुपये दर देण्याचा निर्णय झाला. या बैठकीला राजारामबापू दूध संघ, गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ, भारत डेअरी व इतर दूध संघांचे प्रतिनिधी हजर होते. या निर्णयाला दूध उत्पादकांकडून जोरदार विऱोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.