Eknath Shinde on Mahim Constituency: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत. सदा सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये शिष्टाईचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली असून, एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. 


'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सदा सरवणकर यांना आपली यांना भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासांची मुदत दिली आहे. नुकतीच सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुती माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेला मदत केली होती. यापुढेही त्यांची मदत होईल असं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत आहे. 


आशिष शेलारांनी मांडली होती भूमिका 

अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा देण्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही आशिष शेलार यांनी विचारला आहे. दरम्यान अमित ठाकरे 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सध्याच्या स्थितीनुसार, माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. शिवसेनेकडून सदा सरवणकर, उद्धव ठाकरेंच्या पक्षाककडून महेश सावंत रिंगणात आहेत. 


आशिष शेलार काय म्हणाले?


"मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांनाही विनंती आणि चर्चा करणार आहे. महायुतीत कोणताही मतभेद, दरार नाही. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीलाही आमचा विरोध नाही. पण असं का होऊ शकत नाही की, महायुती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्याच घरातील, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल, तर महायुती आपण सर्वांनी त्याला समर्थन देऊ. आपण सगळेजण त्यांना निवडून देऊ," असं आशिष शेलार म्हणाले आहेत. 


"राज ठाकरेंनी सर्वांशी संबंध जपले. उद्धव ठाकरेंना वाटत नसलं तरी आम्हाला वाटतं. अमितला समर्थन द्यावं अशी माझी भूमिका आहे. मी तिघांशी बोलेन, मतभेद असेल तर दूर केले जातील, महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी," असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. 


 महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचंही आशिष शेलार म्हणाले आहेत. "कुठलाही मतभेद नाही. निवडून कोण येईल हा मुद्दा आहे. उमेदवारांच्या संदर्भात आम्ही एकमेकांना मदत करू. काँग्रेस 90 पर्यंत आलं, सेनेसमोर झुकलं. आज भाजपची दुसरी यादी येईल," असं त्यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिक यांचं काम करणार नाही. देवेंद्र फडणवीस भूमिका मांडतील अशसं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.