Devendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनाम केल्याचं दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच विनोद तावडे दोषी नसून, जेव्हा निवडणुकीत पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातीलच हा प्रकार आहे असा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अनिल देशमुख यांनी हिंदी चित्रपटातील सलीम-जावेद यांच्याप्रमाणे स्टोरी सुरु केल्या आहेत. आता असाच हल्ला ते दाखवत आहेत. मी पोलिसांची पत्रकार परिषद पाहिली, त्यातून तेथील चित्र स्पष्ट झालं आहे. 10 किलोचा दगड मारल्यावर विंडशिल्ड फुटली का नाही? 10 किलोचा दगड पडल्यावर बोनेटला साधा ओरखडा का आला नाही?," असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. 


पुढे ते म्हणाले, "एकच दगड आत आला आहे. मागील काच फोडून तो आत आला आहे. मागून दगड मारला असेल तर मागे लागला पाहिजे, तो पुढे कसा लागला? रजनीकांतच्या चित्रपटातच असा दगड लागू शकतो. मागून फेतला आणि फिरुन पुढे येऊन डोक्याला लागला. जखम तर दिसत नव्हती. हे जे सगळं समोर आलं आहे. यातून हा सिनेमा तयार करण्यात आला हे दिसत आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनामा केल्याचं दिसत आहे. अशा प्रकारच्या स्टोरील शरद पवारांसह सर्वांनी जाणीवपूर्वक इको सिस्टम निर्माण करुन दिली. पण आज सत्य उघड झालं आहे". 


दरम्यान विरारमध्ये आज भाजपा (BJP) आणि बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना तब्बल 4 तास घेरलं होतं. यावेळी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि क्षितीज ठाकूरही (Kshitij Thakur) तिथे उपस्थित होते. विनोद तावडे 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आले होते असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. या संपूर्ण घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. 
 
"जेव्हा निवडणुकीत पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातीलच हा प्रकार आहे. विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते तिथे केवळ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. कोणताही पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. तसंच आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही हल्ला झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची जी इको सिस्टम आहे त्यांनी जो उद्या दिसणारा पराभव आहे तो कव्हर करण्यासाठी केलेलं हे कव्हर फायरिंग आहे. विनोद तावडे याप्रकऱणी दोषी नाहीत.  त्यांनी कुठलेही पैसे नेले नाहीत, वाटले नाहीत किंवा मिळालेले नाहीत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.