ठाकरे-शिंदेंना `तो` एकटाच नडणार? माघार घेण्यास नकार, अवघ्या 10 मिनिटात CM शिंदेंच्या घरुन...
Maharashtra Assembly Election Mahim: मुंबईमधील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या मतदारसंघातून लढण्यावरुन महायुतीमध्येच मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे. अशातच इथून लढणाऱ्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनीच अल्टीमेटम दिला आहे.
Maharashtra Assembly Election Mahim: माहीम मतदारसंघातून लढण्यासंदर्भात महायुतीमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvabkar) हे माघार घेण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. सदा सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी सदा सरवणकर यांना काय तो निर्णय घेण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला. यानंतर रात्री उशीरा सरवणकर पुन्हा 'वर्षा' बंगल्यावर गेले होते. मात्र ही बैठक अवघ्या 10 मिनिटांमध्ये संपली आणि सरवणकर बाहेर पडले. सरवणकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
महायुती राज ठाकरेंना समर्थन देण्याच्या भूमिकेत
सदा सरवणकर यांना आपली भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहिल्यांदा झालेल्या भेटीदरम्यान 24 तासांची मुदत दिली. मनसेकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासहीत काही ठिकाणी उमेदवार दिला जाणार नाही. त्यामुळेच मनसेसाठीही महायुतीने सहकार्य करावं अशी मागणी असल्याचे समजते. महायुतीकडून माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहे. आपल्या या भूमिकेवर महायुती ठाम असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेस महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यापुढेही त्यांची मदत होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत. या चर्चेनंतर सरवणकर पुन्हा 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले होते.
अवघ्या 10 मिनिटांमध्ये पडले बाहेर
मुख्यमंत्री शिंदेंनी अल्टीमेटम दिल्यानंतर सदा सरवणकर वर्षा बंगल्यावरुन निघाले खरे. मात्र रात्री उशीरा पुन्हा ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. अल्टीमेटम मिळाल्यानंतर काही तासांमध्ये ते पुन्हा शिंदेंच्या निवासस्थानी आले. या दुसऱ्या भेटीदरम्यान त्यांनी सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडल्याचे समजते. मात्र ही दुसरी भेट अवघ्या दहा मिनिटांसाठी होती. दहाव्या मिनिटाला सरवणकर 'वर्षा'मधून बाहेर पडले. सदा सरवणकर ह्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असा निरोप दिला असून त्यांची भूमिका बंडखोरीची दिसत आहे. सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नसून उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मागील अनेक दशकांपासून माहिममधून आमदार असलेले सरवणकर निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना एकाच वेळी नडणार आहेत, हे स्पष्ट आहे.
नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
तयारीला लागण्याचे समर्थकांना निर्देश
दरम्यान, सरवणकर यांनी शनिवारी रात्री त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना, मुख्यमंत्र्यांचा आपल्याला आशिर्वाद असल्याचा दावा केला होता. तसेच दादर, माहिम आणि प्रभादेवीमध्ये आपला उमेदवार निवडून आलाच पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं सरवणकरांनी समर्थकांना सांगितलं होतं. तसेच आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं ते दुसऱ्या भेटीत मुख्यमंत्र्यांना सांगून आले आहेत. शनिवारी रात्री समर्थकांशी बोलताना भाषणाच्या शेवटी सरवणकर यांनी, "आपण सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहोत," असं सांगत तयारीला लागा असं म्हटलं होतं. आज सरवणकरांनी अर्ज भरला तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार की सरवणकरांच्या हट्टासमोर मुख्यमंत्री शिंदे नमतं घेणार हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेची आहे.