`महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...`, राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले `मी काय पहिल्यांदा...`
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच लाडकी बहिण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत पैसे वाटपावरुन टीका केली आहे.
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच सरकारी योजनांच्या माध्यमातून पैसे वाटवण्यावरुन टीका केली आहे. टोलसाठी आम्ही आंदोलन केलं असून, मुंबईतील टोलनाके बंद झाले हे आमच्याच पक्षाचं यश असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच महायुतीने काही जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपण जर,तर वर चर्चा करत नाही असं सांगितलं.
'टोलमाफी आमचं यश'
"माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सातत्याने यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसचं सरकार असल्यापासून ते लढा देत आहेत. आपली फसवणूक होत आहे हा मुद्दा आम्ही लोकांसमोर मांडला. आज हे पाचही प्रवेशद्वार बंद झाले आहेत. त्याबद्दल मी सरकारचंही अभिनंदन करेन. उशिरा का होईना पण त्यांना या गोष्टी समजल्या. फक्त काळजी एकाच गोष्टीची आहे की, निवडणुकीच्या तोंडावर टोलानाके बंद करायचे आणि नंतर सुरु करायचे असं होऊन चालणार नाही. तसं आम्ही होऊदेखील देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी टोल बंद करायचे आणि निकाल लागल्यानंतर सुरु करायचे अशी फसवणूक करु नका. अशा अनेक गोष्टी आजपर्यंत घडल्या आहेत," असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "अनेकांनी टोलनाके बंद करतोय असा शब्द दिला, पण नंतर पैसे पूर्ण वसूल न झाल्याने सुरु करावे लागतील असे प्रकार झाले आहेत. जर असा निर्णय झाला असेल तर लोकांनाही समाधान आहे. अखेर किती पैसे येतात आणि कुठे जातात हे कळण्याचा मार्ग नाही. आजपर्यंत झालेला व्यवहार सगळा रोख होता. ते कोणाकडे गेले, कोणाला किती मिळाले, कोणच्या खिशात किती जमा झाले यावर सगळेच गप्प होते. आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतील. पण जगाला हे आंदोलन कोणी केलं हे माहिती आहे. राज ठाकरेने एखादं आंदोलन केल्यास काय होतं असा प्रश्न तुम्ही विचारता, तर हे असं होतं".
सरकारी योजनांमधून पैसे वाटण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "असे फुकट पैसे वाटणं योग्य नाही. तुम्ही 5 हजार, 7 हजार वाटत आहात. ते तुमच्या घरचे पैसे आहेत का? हे सरकारचे पैसे आहेत. वाटावाटी करत असल्याने सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. आता ते असे पैसे वाटू शकत नाहीत. राज्य कंगाल होईल'.
मनसे किती जागांवर लढणार असा प्रश्न विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जागा मनसे लढवणार.लढवायच्या म्हणून लढवायच्या असं नाही. मी काही पहिल्यांदा लढत नाहीये. 2009, 2014 मध्येही लढवल्या". महायुतीकडून प्रस्ताव आला तर असं विचारलं असता राज ठाकरेंनी मी मी जर, तर वर चर्चा करत नाही. मी सभेत जे बोललो ते बोललोय असं उत्तर दिलं.