महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यादरम्यान सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांवर फैरी झाडल्या जात आहेत. आपला पक्ष, उमेदवार जिंकावा यासाठी सर्वांकडून जोमाने प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत. माढा आणि करमाळामधील शिंदे बंधूंना पाडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यासोबत आपला नाद करायचा नाही, असा अप्रत्यक्ष इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सख्खे भाऊ असतील किंवा कोणी असतील. एकदा रस्ता चुकला तर गद्दाराला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीत साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं. हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की, सर्वांचा नाद करायचा पण...", असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांनीही जोरात आवाज करत त्यांना प्रतिसाद दिला. 


'दिल्लीची नेहमीच महाराष्ट्रावर वाईट नजर'


दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली असल्याचं जोरदार हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी भाजपावर केला आहे. अदृश्य शक्तींनी कधी महाराष्ट्रावर प्रेम केले नाही, तसेच महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं, हे दुर्दैवी आहे, अशी खंत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्या सांगलीच्या आटपाडी येथे खानापूर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारा निमित्त आयोजित सभेत बोलत होत्या.


मी साहेबांना  सोडलेलं नाही - अजित पवार


मी साहेबांना सोडलेलं नाही असं अजित पवारांनी म्हटलं आहे. सर्व आमदारांची इच्छा होती सरकारमध्ये जावं. कारण आपण मंजूर केल्या कामाला स्थगिती आली होती. त्यामुळे सर्व आमदारांनी सत्तेत जावं असं म्हटलं असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. सरकार गेल्यानंतर महायुती सरकारनं आपण मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली होती. विरोधी पक्षनेता असताना महायुतीच्या सरकारनं कामाना स्टे दिलाय.. त्यामुळे अडचण झाल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.