Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. उमेदवारीचा अंदाज घेऊन पक्षांतरही होताना दिसत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी येत्या विधानसभेला आपल्या मुलांसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भात नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांनी उमेदवारी मागितली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांनी आर्णी मतदारसंघातून तयारी चालविली आहे.तर माजी आमदार विजय खडसे व त्यांचे पुत्र प्रज्ञानंद या दोघांनीही उमरखेड मधून उमेदवारीसाठी दावेदारी केलीय.वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहे.


अकोला जिल्ह्यात अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचे माजी मंत्री अझर हुसेन यांचे पुत्र झिशान हुसेन तर भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.


अकोट मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांनी उमेदवारीसाठी दावा केलाय. तर बाळापूर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे पुत्र प्रकाश तायडे यावेळी इच्छुक आहेत. 


वाशिममध्ये कारंजा मतदारसंघात भाजपाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटील यांचा मुलगा न्यायक पाटणी ह्यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केलीय. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे मुलगा सुगत चंद्रिकापुरे याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. तर गडचिरोली विधानसभेत माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र ऍड. विश्वजीत गोवासे हे इच्छुक आहेत. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या वडिलांविरोधातच राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.


राजकारणात घराणेशाहीवरून कायम चर्चा होत असते. मात्र आता आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी वडिलांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे.