Maharashtra Assembly Election: नाशिक पश्चिम जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) खटके उडल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिम जागेवर सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) दोघेही अडून बसले आहेत. त्यानंतर संजय राऊत तडकाफडकी निघून गेल्याची माहिती मिळत आहे. 


विदर्भातील मतदारसंघांवरुनही तणाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील काही मतदारसंघातवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव काँग्रेसकडून इच्छुक आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. यवतमाळ शहरावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस दावा करीत आहेत. अकोला पश्चिम हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र, यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा या जागेवर इच्छुक आहेत. कारंजा आणि जळगाव जामोद या जागा काँग्रेसच्या आहेत. मात्र. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केला आहे. दिग्रससाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आपल्या मुलासाठी प्रयत्न करीत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून पवन जैस्वाल यांनी तयारी सुरू केली आहे. या जागांवर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मातोश्रीवर तातडीची बैठक


उद्धव ठाकरेंनी आज तातडीने बैठक बोलावली. दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, असे संकेत खासदार संजय राऊतांनी दिले आहेत.


जागावाटप आणि उमेदवार निवडीसाठी उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावल्याच समजत आहे. या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत,सुभाष देसाई उपस्थित आहेत.. बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे सा-यांचं लक्ष आहे. दरम्यान, काही अंतर्गत आजार आहेत. एक्सरे-एमआरआय काढावे लागतील. ते आज बैठकीत होईल.
आज नक्कीच निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 



"आम्ही अजिबात नाराज नाही, नाराजी कळविण्याचा देखील प्रश्न येत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय घेता येतात. आम्ही कोणाला का नाराजी कळवायची. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो चर्चांना उपस्थित राहतो. आम्हाला भाजपच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे," असं संजय राऊत म्हणाले आहेत.