पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, `कोणाचे...`
Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात कोणतेही नाव थेट जाहीर करण्यात आलेलं नसतानाच शरद पवारांनी आगदी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शरद पवारांनी 'झी 24 तास'ला 'टू द पॉईंट' कार्यक्रमामध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळेस त्यांना राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री असा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळेंचं नाव सतत या संदर्भातून पुढे येत असल्याबद्दल आपलं मत नोंदवलं. एवढ्यावरच न थांबता शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल याबद्दलही भाष्य केलं.
सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री पदाबद्दल स्पष्टच बोलले
पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात यासंदर्भातून महिला धोरण आणलं असं तुम्ही म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपण हे विधान पत्रकारांच्या प्रश्नावर केल्याचं सांगितलं. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नसल्याचं सांगितलं. उत्तर देताना, "मला सुप्रियाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर मी म्हणालो की, तिची (खासदार म्हणून) चौथी टर्म आहे. तिला राष्ट्रीय राजकारणात आणि संसदीय राजकारणामध्ये रस आहे. तिला इथे रस नाही. तुम्ही वारंवार विचारता. मात्र तिचा दुसरीकडे कुठे रस आहे असं मला दिसत नाही. लोकसभेच्या सर्व सभासदांमध्ये तिचा क्रमांक कायमच पहिला दुसरा असतो. तिची हजेरी 92 ते 93 टक्के असते. त्यामुळे तिच्या डोक्यात मुख्यमंत्रिपद आहे असं मला दिसत नाही," असं पवारांनी स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर
मुख्यमंत्री म्हणून मनातला चेहरा कोण? पवारांनी सांगावं; ठाकरेंनी केलेली मागणी
यानंतर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेल्या खलबतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मनात असलेल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगावं असं 'झी 24 तास'ला 'टू द पॉईंट' कार्यक्रमामध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटल्याचा संदर्भ 'झी 24 तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारला. त्यावर शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवण्याचा फॉर्म्युला कसा असेल हे सांगताना, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असं म्हटलं.
नक्की वाचा >> 'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?
कोण होणार मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री कोण असेल असं विचारल्यावर शरद पवारांनी, "माझं म्हणणं त्यामध्ये (मुख्यमंत्री पदाचा चेहरा या विषयावर) एवढचं आहे की निवडणुका होऊ द्या. कोणाचे किती लोकं येतात हे स्पष्ट होऊ द्या. ज्याचे लोक अधिक असतील त्याचा ऑटोमॅटिकच सीएम होईल," असं उत्तर दिलं. म्हणजेच महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसपैकी ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, असं पवारांचं म्हणणं आहे.