Maharashtra Assembly Election: "बेइमान-गद्दारांचे सरकार महाराष्ट्रात आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडून मिंधे सरकार आणले. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे मान्य करूनही सर्वोच्च न्यायालयाने अडीच वर्षे चालू दिले. ज्यांनी न्याय करायचा ते सरन्यायाधीश चंद्रचूड ‘तारीख पे तारीख’चा खेळ करीत राहिले व शेवटी निवृत्त झाले. विधानसभेची मुदतही संपली, पण न्याय काही झाला नाही. त्यामुळे गद्दारांचा न्याय आता जनतेच्याच न्यायालयात होईल," असं प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.


‘सब का साथ, सब का विकास’ ऐवजी ‘व्होट जिहाद’, ‘बटेंगे तो कटेंगे’ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"भाजप व त्यांच्या मिंध्यांकडील प्रचाराचे मुद्दे संपले. पैशांचे वारेमाप वाटप हीच त्यांची ताकद आहे. गेल्या दहा वर्षांपासून जातीधर्मात तेढ, तणाव निर्माण करून निवडणुका लढवल्या जात आहेत. ‘सब का साथ, सब का विकास’ हा मोदींचा नारा होता. त्याची जागा ‘व्होट जिहाद’, ‘बटेंगे तो कटेंगे’ने घेतली. विकासाच्या नावाने ‘ठणठण गोपाला’ झाल्यानेच भाजपला हे ‘बटेंगे’, ‘व्होट जिहाद’सारखे विषय घेऊन मतांसाठी बांग मारावी लागत आहे. या देशात सर्वच जातीधर्मांच्या नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. हीच आपल्या संविधानाची ताकद आहे, पण भाजपला संविधानाची ताकद कमजोर करून स्वतःची हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे," असा घणाघात ठाकरेंच्या पक्षाने 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे.


नक्की वाचा >> 'फडणवीस आपली...', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल


फडणवीस यांनी महाराष्ट्र धर्माशीच द्रोह केला


"मुसलमानांनी जेव्हा भाजपला मतदान केले, तेव्हा तो ‘व्होट जिहाद’ नव्हता, पण मोदींच्या वर्तणुकीस वैतागून लोकशाही व संविधान रक्षणासाठी मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैन एकवटले तेव्हा तो ‘व्होट जिहाद’ ठरवला गेला. लोकशाही मार्गाने मत देणाऱ्यांना लक्ष्य करून धर्मयुद्धाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी खरे तर महाराष्ट्र धर्माशीच द्रोह केला. मोदी-शहांनी महाराष्ट्र उघडपणे लुटला. अदानी या उद्योगपती मित्राच्या घशात मराठी माणसाची मुंबई घातली व हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत मोदींचा जय करणारे फडणवीस-मिंधे यांना महाराष्ट्र धर्माचे शत्रूच म्हणावे लागेल," असा हल्लाबोल ठाकरेंच्या पक्षाने केला आहे.


नक्की वाचा >> 'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोला


महाराष्ट्र राज्याची पत आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे सरकार


"महाराष्ट्रात बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. महाराष्ट्राची औद्योगिक आणि आर्थिक घसरण सुरू आहे. गुंडगिरी, लुटमार, कोयता गँगचा हैदोस, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचाराने उन्मळून पडतो व त्याच भ्रष्टाचाराच्या पैशांनी निवडणुका लढवल्या जातात. महाराष्ट्र राज्याची पत आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे सरकार मोदी-शहा चालवत आहेत. महाराष्ट्राला हे सर्व उलथवून टाकावे लागेल. आज प्रचार संपला, उद्या मतदान होईल. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मराठी माणसा जागा रहा. सावध रहा!" असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.