Maharashtra Assembly Election: "विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपला आहे. गेल्या पंधरा दिवसांतील राजकीय धुळवड त्यामुळे थांबली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपप्रणीत महायुती असाच एकंदरीत सामना आहे. बाकी मधल्यामध्ये भाजपपुरस्कृत सुपाऱ्या आणि चणे-फुटाणे उडत आहेत," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रचार संपल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया 'सामना'च्या माध्यमातून नोंदवली आहे. "सगळाच पैशांचा खेळ. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा साफ खेळखंडोबा झाल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापली राज्ये वाऱ्यावर सोडून महाराष्ट्रात पिचकाऱ्या उडवीत फिरत होते," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.


योगींवर डागली तोफ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"उत्तर प्रदेशातील झाशी येथील सरकारी इस्पितळात आग लागून 12 नवजात अर्भकांचा जळून कोळसा झाला, पण त्या राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ‘बटेंगे तो कटेंगे’चे नारे देत फिरत होते. हा इतका निर्घृण कारभार फक्त महाराष्ट्रावर ताबा मिळविण्यासाठी चालला आहे. मणिपुरात हिंसाचार पुन्हा भडकला. चार महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करून ठार केले. मणिपुरातील मंत्र्यांचे बंगले लोकांनी जाळले आणि पंतप्रधान, गृहमंत्री महाराष्ट्र व झारखंडच्या प्रचारात शिवसेना, राष्ट्रवादी काँगेसवर टीका करीत राहिले," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदी-शाहांबरोबरच योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला आहे.


नक्की वाचा >> 'फडणवीस आपली...', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल


'मोदी-शहांचा खोटेपणा रोज उघडा पडला'


"‘एक है तो सेफ है’ हा त्यांचा नवा नारा म्हणजे स्वतःचा डरपोकपणा सिद्ध करणारा आहे. मणिपुरात जाऊन तेथील हिंसाचार थांबविण्याची धमक आणि कुवत देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्र्यांत नाही व महाराष्ट्रात येऊन ते हिरोगिरी करतात. महाराष्ट्र सुरक्षित आहेच हो, तुमच्या येण्याने अस्थिर आणि असुरक्षित होत आहे. मोदी म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी दोन चांगले शब्द बोलून दाखवावेत.’’ दुसऱ्याच दिवशी प्रियंका गांधी यांनी कोल्हापूरच्या सभेत मोदी यांना खोटे ठरवले. ‘‘बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता, त्यांचे फोटो लावून मते मागता आणि त्यांच्या चिरंजीवांच्या पाठीत खंजीर खुपसता! हे कसले बाळासाहेबांचे प्रेम?’’ प्रियंका गांधी यांनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडून टाकला. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला स्वतः राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहून आदर व्यक्त केला. निवडणूक प्रचारात मोदी-शहांचा खोटेपणा रोज उघडा पडला. गुजरातचे मंबाजी व तुंबाजी यांनी महाराष्ट्रात येऊन जो हैदोस घातला. त्याचा अंत करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक आहे," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.