MNS Candidate List 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्याचबरोबर मनसेने पुण्यातील मतदारसंघात तीन उमेदवार जाहीर केले आहेत. यात खडकवासल्यातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. मयुरेश वांजळे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर महायुतीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयुरेश वांजळे यांची बहिण सायली वांजळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. तर, वांजळेंच्या आई हर्षदा वांजळे यांनीही राष्ट्रवादीकडून 2011 साली विधानसभा लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर सायली वांजळे यांनीही राजकारणात प्रवेश केला. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. वारजे प्रभागातून त्या निवडूनदेखील आल्या होत्या. आता मनसेनेच सायली यांचे भाऊ मयुरेश वांजळे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळं खडकवासल्यात महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. 



कोण होते रमेश वांजळे?


रमेश वांजळे यांनी 2009 साली मनसेच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती. मनसेत असताना ते गोल्डनमॅन म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्यांनी अनेक आंदोलनं मनसे स्टाइल गाजवली होती. विधानसभेत मराठी ऐवजी हिंदीतून शपथ घेणाऱ्या समाजवादी पश्राच्या अबू आझमी यांचा माईक हिसकावून घेतला होता. त्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. पुण्याच्या हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य ते विधानसभेतील आमदार असा त्यांचा प्रवास होता. मात्र, 2011 साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.