Maharashtra Assembly Elections 2024 :  लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभेकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष असणार आहे.  पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांच्या विरोधात चक्क त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार दंड थोपटण्याची शक्यता आहे.  असे झाल्यास बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते… …


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या वाहनांचा ताफा तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे.  या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता  बारामतीतून राष्ट्रवादीचे  उमेदवार अजित पवार हेच असतील हे आता स्पष्ट झालंय. 


यापूर्वी अजित पवारांनी तब्बल सहा वेळा बारामतीचं नेतृत्व केलंय आता सातव्यांदा अजित पवार  बारामतीच्या मैदानात उतरलेत. येत्या  28 तारखेला अजित पवार  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपर्यंत अजित पवारांच्या विरोधात लढणा-याचं डिपॉझिट जप्त झालंय. मात्र, बारामतीची यंदाची लढाई अजित पवारांसाठी तितकी सोपी नसणार आहे.  यंदा अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 


लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं.  मात्र मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा यांना  पराभवाचा सामना करावा लागला.  सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजारांचे लीड मिळालं होतं. 


लोकसभेला काकांनी पुतण्याला आसमान दाखवलं.  आता  विधानसभेतही काकांच्या  विरोधात पुतण्या दंड ठोकून उभा राहण्याची शक्यता असल्यानं बारामतीत लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.


कोण आहेत युगेंद्र पवार?  


शरद पवारांचे नातू
अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र
फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचं काम पाहतात
विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार