आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
Uddhav Thackeray bag Check: उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्या धाराशिव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत. उमरगा विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. केज मतदार संघामध्ये नितीन गडकरी यांची सभा होणार आहे सकाळी 11 ते 12 दरम्यान ही सभा सुरू होईल.
वणी येथेही तपासल्या होत्या बॅगा
उद्धव ठाकरे काल यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी असतानाही त्यांच्या बॅगांची तपासणी झाली होती. हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओदेखील शूट केला होता. तसंच निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडीओ शूट करुन मला पाठवा असं सांगितलं होतं.
भास्कर जाधवांची प्रतिक्रिया
हे खूप संतापजनक आहे. देशातील लोकशाही संपुष्टात येतेय की काय? असा प्रश्न पडतोय.हा महाराष्ट्रातल्या माणसांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिले. केवळ विरोधकांच्या बॅगा का तपासता? अजित पवार यांची राष्ट्रवादी, भाजपच्या बॅगा का तपासल्या जात नाही? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.
संजय राऊतांची टीका
उद्धव ठाकरे बॅग तपासणीवर संजय राऊत यांनी टिका केली आहे. "लोकसभेच्या वेळी मी स्वत: हा व्हिडीओ केलाय. एका तासासाठी मुख्यमंत्री नाशिकमध्ये प्रचारसभेला आले होते. त्याच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरल्या. एका तासासाठी एवढे कपडे घेऊन जातो का माणूस? शिंदे शिर्डीला प्रचाराला गेले होते तेव्हा त्यांच्या विमानातून उतरलेल्या बॅगांचा व्हिडीओ आम्ही प्रसारित केला होता ना? त्या बॅगा कसल्या होत्या? दोन तासासाठी एका हॉटेलात थांबले आणि इतक्या बॅगा? याचा अर्थ काय? आमच्या करता तपासण्या यांच्या कधी करणार?" असा सवाल संजय राऊतांनी विचारला. तसेच पुढे बोलताना, "यंत्रणा विकत घेतली आहे? खोके तुम्हालाही पोहोचले आहेत का?" असं राऊत यांनी विचारलं."कोण कुठे कसं पैशाचं वाटप करतेय हे आम्ही आतापर्यंत सांगत आलो आहोत. एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोहोचले. सांगोल्यात काही नाक्यावर 15 कोटी पकडले. पण फक्त पाच कोटी दाखवले. उरलेले 10 कोटी कुठे आहेत? कोणाचे ते सांगितले का? गाडी कोणाची? कोण होतं गाडीत आम्हाला माहितीये. पैसे कोणाचे होते? कुठे गेले सांगितलं का?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, "उद्धव ठाकरेंची तपासणी करण्याला आक्षेप नाही. सर्वांना समान न्यायानं निवडणूक आयोगाने वागवलं पाहिजे. मुख्यमंत्री, गृहमंत्री असतील सर्वांना समान वागवा. प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून, अमित शाहांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? त्या कसल्या बॅगा असतात?" असा सवालही राऊत यांनी विचारला.