नागपूर: देशाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राच्या शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती बोबडे यांचे अभिनंदन करताना सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायमूर्ती बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव यांनी म्हटले की, सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर जगाने शरद बोबडे यांचे कौतुक केले. मात्र, आईने (महाराष्ट्राने) केलेले कौतुक महत्त्वाचे असते. योगायोग म्हणजे शरद ऋतू सुरु झाला आहे. हा ऋतू नवनिर्मिती करमारा आहे. शरद बोबडे यांची ख्याती बघता ते रामशास्त्री बाण्याने न्यायदान करतील. देशात ज्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. जो कायदा केला आहे, तो घटनाबाह्य आहे किंवा नाही, याबाबत बोबडे रामशास्त्री बाण्याने न्याय देतील, अशी खात्री असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलण्यास उभ्या राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार फटकेबाजी करत सव्याज परतफेड केली. महाराष्ट्राला शरद बोबडे यांचा अभिमान वाटतोय. मुख्यमंत्र्यांप्रमाणे वन्यप्राणी आणि वन्यसंवर्धनाची आवड त्यांनाही आहे, असे सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची फिरकी घेतली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर त्याकाळी शरद बोबडे यांच्या घरी उतरले होते. शरद बोबडे यांच्या पूर्वजांना स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्त असल्याची खात्री पटल्यामुळेच त्यांनी सावरकरांना घरात राहून दिले, असा टोलाही फडणवीसांनी सरकारला लगावला. 



शरद बोबडे यांनी नागपुरातून वकिलीची सुरुवात केली. त्यांची चौथी पिढी वकिलीच्या क्षेत्रात काम करत आहे. शरद बोबडे यांनी लाखो शेतकऱ्यांच्या नादारीचे अर्ज न्यायालयात नेले. हे शेतकरी कशाप्रकारे कर्ज भरू शकले नाही, हे सांगितले. ते शेतकऱ्यांकडून कधीच पैसे घेत नसत, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी न्या. बोबडे यांचे कौतुक केले.