Maharashtra Bandh: बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराचा निषेध कऱण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यादरम्यान हायकोर्टाने बंद करणं योग्य नाही अशा शब्दांत फटकारलं आहे. यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) हायकोर्टाचा आदर राखत बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान शरद पवार पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) पुतळ्यासमोर बसून आपला निषेध नोंदवणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार उद्या सकाळी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसणार आहेत. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तिथे बसून शरद पवार बदलापूर घटनेचा निषेध आणि वेदना व्यक्त करणार आहेत.


काँग्रेसही काळ्या पट्ट्या बांधून करणार निषेध


नाना पटोले यांनी सांगितलं आहे की, "उद्याचा बंद कोर्टाचा आदर राखून रद्द करत असलो तरी काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून 11 ते 12 असा एक तास आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही एक तास जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रत्येकजण आंदोलन करणार आहे. सर्वसामान्य नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतील. 
त्यांनी बंद ठेवला तर त्याला आमची नकार नसेल".



शरद पवारांनी काय आवाहन केलं आहे?


"बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते," अशी पोस्ट शरद पवारांनी एक्सवर केली आहे.