मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट प्रकरण, सुनैना विरोधातील FIR रद्द
एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी सुनैनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने यापूर्वी सुनैनाच्या अटकेवर स्थगिती दिली होती.
मुंबई : मुंबई पोलिसांनी सुनैना होलेच्या (Sunaina Holle) विरोधात दाखल केलेली एफआयआर मुंबई हायकोर्टने (Bombay high court) फेटाळून लावली आहे. सुनैनावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचा आणि जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशन आणि पालघर येथे शिवसेनेच्या नेत्यांनी सुनैना (Sunaina Holle) विरोधात 3 एफआयआर दाखल केले होत्या. ही एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी सुनैनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने यापूर्वी सुनैनाच्या अटकेवर स्थगिती दिली होती. त्यानंतर, कोर्टाने जानेवारीत या प्रकरणात सुनावणी देताना आपला निर्णय राखून ठेवला. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मनोज मोहिते यांनी सुनैना होलेच्या याचिकेला विरोध केला.
कोर्टानुसार मुंबई पोलिसांची एफआयआर चुकीची
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने सांगितले की, काय ठाकरे सरकार सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात लिहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करणार का? त्यानंतर हायकोर्टाने याप्रकरणी पुढील सुनावणी घेताना मुंबई पोलिसांच्या एफआयआरला (FIR) फेटाळून लावले.
सुनैना (Sunaina Holle) प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने म्हटले आहे की, सुनैनाचे ट्वीट वाचल्यावर कोणत्याही व्यक्तीला हे समजणार नाही की, त्यामध्ये कोणत्या जातीचे, समाजाचे नाव लिहिले गेले आहे. तसेच सुनैनाचे ट्विट पाहून असे दिसत नाही की, त्या ट्वीटमुळे जातीय हिंसाचार किंवा दंगली पेटू शकतील. त्यामुळे हायकोर्टाने सुनैनाच्या विरोधातील मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला आहे.
मुंबई पोलिसांनी सुनैना विरोधात कलम 294 (सार्वजनीक ठिकाणी आपत्तीजनक भाषेचा वापर करणे), कलम 499 (मानहानी), कलम 506 (अपराधीक धमकी) आणि आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 66 Aअन्वये गुन्हा दाखल केला होता.