Devendra Fadnavis Funny Comment: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री या नात्याने विधानसभेमध्ये सादर केला. फडणवीस यांनी पंचामृत धोरणावर यंदाचा अर्थसंकल्प आधारीत असेल असं सांगत अर्थसंकल्पाचे पाच प्रमुख भाग कोणते हे सांगितले. श्वावत शेती, महिला ओबीसी मागास वर्ग विकास, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मित, पर्यावरण पुरक विकास हे पाच मुद्दे पंचामृत धोरणामध्ये असतील अशी घोषणा फडणवीस यांनी केली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच टॅबवरुन अर्थसंकल्पाचं अर्थमंत्री म्हणून वाचन करताना फडणवीस यांनी एक-एक करत पाच मुद्द्यांअंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी आणि योजनांची घोषणा केली. मात्र शेवटच्या मुद्द्याकडे वळण्याआधी पंचामृत योजनेमधील मुद्द्यांचा अमृत असा करत असलेला उल्लेख लक्षात घेत फडणवीस यांनीच एक मजेदार विधान केलं. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळजवळ एक तास अर्थसंकल्पीय भाषण केल्यानंतर फडणवीस पंचामृत धोरणातील शेवटच्या मुद्द्याकडे वळले. रोजगार निर्मितीसंदर्भातील घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत धोरणापैकी शेवटच्या अमृताकडे म्हणजेच मुद्द्याकडे वळत असल्याचं सांगितलं. त्यानंतर फडणवीस हे काही सेकंद थांबले. त्यांनी खिशातून रुमाल काढला. चष्मा काढून चेहरा पुसला आणि पुन्हा बोलू लागले. "कसं आहे मला सावधानतेनं बोलावं लागतं कारण अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचे," असं फडणवीस यांनी म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर फडणवीस यांनी डोक्यावरुन हात फिरवला. दरम्यान सभागृहामध्ये सदस्यांचा हशा सुरुच होता. काही सेकंद पॉज घेतल्यानंतर फडणवीस यांनी पुढील भाषण सुरु केलं.


अमृता कायमच चर्चेत


देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचं नाव अमृता (Amruta Fadnavis) असं असून याच नामसाधर्म्यावरुन आपल्या विधानाचा वेगळाच अर्थ काढला जाईल अशी मिश्कील टीप्पणी अर्थमंत्र्यांनी केली. अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या राजकीय टीप्पण्यांबरोबरच सूचक विधानांसाठी चर्चेत असतात. अमृता फडणवीस या अनेकदा अप्रत्यक्षपणे राजकीय भाष्य करताना दिसतात. याशिवाय अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यामुळेही चर्चेत असतात. आज अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अमृता यांचे पती आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या नावाचा उल्लेख करत मजेदार विधान केल्याने सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी विरोधी पक्षातील आमदारांबरोबरच शिंदे गटातील आमदार आणि भाजपाचे आमदारही हसत असल्याचं दिसून आलं.